Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी ...

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी एमपीएल२०२४मधील रणजीत निकमने झळकावले पहिले अर्धशतक

पुणे,३ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रणजीत निकम नाबाद ६६ धावांसह मुकेश चौधरी(३-३०), अर्शिन कुलकर्णी(३-३५) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा ७ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी प्रभावी मारा करत ईगल नाशिक टायटन्स संघाला धावांवर रोखून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. ईगल नाशिक टायटन्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. भारताच्या १९ वर्षाखालील संघातील खेळाडू अर्शिन कुलकर्णी याला शून्यावर सचिन भोसलेने बाद करून संघाला पहिला धक्का दिला. सचिन भोसलेने दुसऱ्याच षटकात मंदार भंडारी(५धावा)ला बाद करून पाठोपाठ दुसरा धक्का दिला. २बाद १९ अशा बिकट स्थितीत हरी सावंत(२२धावा) व रोहित हाडके(२४धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ३६ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण रामकृष्ण घोष व रोशन वाघसरे यांनी अनुक्रमे हरी सावंत व रोहित हाडके यांना झेल बाद करून नाशिक संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. विशेष म्हणजे हे दोन्ही झेल कर्णधार ऋतुराज गायकवाड याने घेतले.

त्यानंतर रणजीत निकमने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच षटकार व पाच चौकार मारत यावर्षातील एमपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याला अथर्व काळेने २६चेंडूत ३चौकार व २ षटकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ४१ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करून संघाच्या धावगतीचा वेग वाढवला. सातव्या गड्यासाठी रणजीतने दिग्विजय देशमुख(नाबाद १४)च्या साथीत ३०चेंडूत ४८ धावांची भागीदारी करून ईगल नाशिक टायटन्स संघाला २० षटकात ६बाद १९६धावांचे आव्हान उभे केले.

१९६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ४ एस पुणेरी बाप्पा संघाला २० षटकात ९बाद १८८धावापर्यंत मजल मारता आली. अर्शिनने आपल्या पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर शुभम तैसवालला शून्यावर झेल बाद करून तंबूत पाठवले. पाठोपाठ पवन शहा(१२धावा)ला देखील अर्शिनने बाद करून पुणेरी बाप्पा संघाला अडचणीत टाकले. त्यानंतर यश क्षीरसागरने २७चेंडूत २चौकार व २षटकाराच्या मदतीने ३६धावा, राहुल देसाईने २४धावा, रोहन दामलेने २० धावा काढून संघाचा धावफलक हलता ठेवला. पण यश क्षीरसागर, राहुल देसाई, रोहन दामले हे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने २१चेंडूत ४चौकर व १षटकारासह ३८धावा, सूरज शिंदे २३, रामकृष्ण घोष १२ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. विजयासाठी ७चेंडूत १९ धावांची आवश्यकता असताना ईगल नाशिक टायटन्सचा आयकॉन खेळाडू मुकेश चौधरीने ऋतुराजला झेल बाद करून हे आव्हान आणखी कठीण केले. त्यानंतर शेवटच्या षटकात अर्शिनने सुरेख गोलंदाजी करत पाचव्या चेंडूवर विवेक शेलार(६धावा)ला त्रिफळा बाद केले व संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला.

आजचा दुसरा सामना रायगड रॉयल्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज यांच्यात सायंकाळी ७:०० वाजता होणार आहे.

संक्षिप्त धावफलक:
ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ६बाद १९६धावा(रणजीत निकम नाबाद ६६(३४,५x४,५x६), अथर्व काळे ३७(२६,३x४,२x६), रोहित हडके २४, हरी सावंत २२, धनराज शिंदे १७, दिग्विजय देशमुख नाबाद १४, सचिन भोसले २-२१, रोशन वाघसरे १-२५, रोहन दामले १-३९, रामकृष्ण घोष १-४९) वि.वि.४ एस पुणेरी बाप्पा: २० षटकात ९बाद १८८धावा(ऋतुराज गायकवाड ३८(२१,४x४,१x६), यश क्षीरसागर ३६(२७,२x४,२x६), राहुल देसाई २४, सूरज शिंदे २३, रोहन दामले २०, रामकृष्ण घोष १२, पवन शहा १२, मुकेश चौधरी ३-३०, अर्शिन कुलकर्णी ३-३५, हरी सावंत २-२०, दिग्विजय देशमुख १-२९); सामनावीर – रणजीत निकम;

आजचे सामने
४ जून रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
४ जून कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments