पुणे,9 ऑगस्ट 2024 : जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नवमाता,डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक स्तनपान सप्ताह हा दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो.यावर्षीची संकल्पना क्लोजिंग द गॅप : ब्रेस्ट फिडींग सपोर्ट फॉर ऑल ही होती.आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये बालरोग तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,नवजात शिशु तज्ञ व या विभागातील सदस्यांसाठी प्रश्नमंजुषा,नवमातांसाठी जागरूकता व मनोरंजक कार्यक्रम तसेच मिल्क डोनर्सचा सत्कार यांचा समावेश होता.याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी कार्ड मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची संकल्पना स्तनपानाशी संबंधित होती आणि तयार केलेले हे कार्डस नवमातांना देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांना आपली सर्जनशीलता दर्शविण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले तसेच याचा फायदा नवमातांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास होणार आहे.या उपक्रमाचा समारोप नवमाता आणि नवजात शिशूंच्या आहाराची जवळून काळजी घेणाऱ्या परिचारिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाने झाला.


