पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२४ :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या परिसंवादात विविध विधीज्ञ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या यांनी सहभाग घेतला आणि सावित्रीबाई फुले यांनी स्रीशिक्षणाबाबत केलेल्या महत्वपुर्ण कामगिरीमुळे भारतीय स्त्रिया शिक्षण घेऊन राजकीय क्षेत्रात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री पदावर तसेच शास्त्रज्ञ डॉक्टर, इंजिनिअर झाल्या याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे झालेल्या “सावित्रीच्या लेकी” या परिसंवादात त्यांनी आपापली मते व विचार मांडले.
अॅड. मनीषा महाजन यांनी दैनंदिन जीवन जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे गरजेचे आहे असे सांगून तंत्रज्ञानाच्या युगातली आत्ताची युवा पिढी अंधश्रद्धेला बळी पडत आहे याची खंत व्यक्त केली. या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, भारतीय संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन जगण्याची उत्तम कला सांगितली आहे ती आपण आत्मसात करण्याची काळाची गरज बनली आहे. आंतरजातीय विवाह तसेच विधवा पुनर्विवाहाचा विचार समाजामध्ये अजूनही रुजलेला नाही याचीही खंत व्यक्त करत परंपरागत चालत आलेल्या रूढी परंपरेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहून त्या परंपरांना झुगारून देऊन स्त्रीने स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले.
पत्रकार अश्विनी डोके सातव यांनी भारतीय राज्यघटनेत स्त्री आणि पुरुष असा भेद न करता फक्त एक व्यक्ती हा एक घटक समोर त्यांची हक्क आणि कर्तव्य विशद केलेली आहेत. त्यामुळे एका महिलेकडे पाहताना ती एक व्यक्ती म्हणूनच पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे. समाजाने महिलांवर काही बंधने आणि मर्यादा कळत नकळतपणे लादले आहेत. संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे ही बंधने झुगारून देऊन महिलांनी स्वतःचे निर्णय त्यांनी स्वतः घेण्याची गरज आहे. महिलांवर आणि मुलींवर बंधन घालण्यापेक्षा पुरुषांना आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करणे गरजेचे आहे, कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना फक्त ती एक महिला असण्याचा अडसर ठरू नये. समाजाने पुरुषांना देखील काही बंधने मर्यादा नकळतपणे घालून दिलेले आहेत म्हणून पुरुषांना आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करता येत नाही त्यांना रडता येत नाही त्यामुळे काही पुरुष ताण तणावाखाली एवढे जातात की त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो असे त्यांचे मत व्यक्त केले.
अॅड. मनीषा गवळी यांनी बऱ्याचशा महिला कायद्याचं योग्य ज्ञान नसल्यामुळे समाजाला घाबरून त्या कायद्याच्या गोष्टींपासून दूर राहणं पसंत करतात त्यामुळे महिलांना कायद्याचं प्राथमिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार स्वतःमध्ये खोलवर रुजवून स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे लढा दिला पाहिजे, क्राईम रिपोर्टिंग करताना योग्य ती गोपनीयता पाळणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र अविरतपणे सुरू राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. डॉ. माधवी खरात यांनी पोशाखी व्यक्तीत्वात बाईपण गुंडाळले जाते, महिलांच्या पेहरावावरून महिलांची पारख करणे अत्यंत चुकीचे आहे, पुरुषांची महिलांकडे पाहण्याची निर्लेप दृष्टी निर्माण होणे गरजेची आहे, भारतीय संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे परंतु स्री स्वातंत्र्य एका मर्यादेच्या आतच राहिले आहे. स्री शक्तीचा अविष्कार आधी स्वतः महिलांना होणं आवश्यक असून स्वःत्वाची जाणीव जेव्हा महिलांना आधी स्वतःला होणे गरजेचे असे सांगून स्त्रीने स्वतः सगळी बंधने झुगारून देऊन स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
अनिता सावळे यांनी महिलांनी स्वतःला इतरांपेक्षा कमी न समजता व्यवस्थेला जाग आणण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी खंबीरपणे आणि नीडरपणे उभं राहणं काळजी गरज निर्माण झाली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिसंवादास विविध सामाजिक क्षेत्रातील महिला, विद्यार्थीनी तसेच नागरिक उपस्थित होते.


