Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सवात पुणेकरांच्या सेवेसाठी ३० रुग्णवाहिका आणि ४० रायडर्स सज्ज पुण्यातील गणेशोत्सव...

गणेशोत्सवात पुणेकरांच्या सेवेसाठी ३० रुग्णवाहिका आणि ४० रायडर्स सज्ज पुण्यातील गणेशोत्सव मंडळे व सामाजिक संस्थांचा उपक्रम

पुणे: मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीने आणि रायडर्स ऑफ दक्खन यांच्या सहकार्याने गणेशोत्सवात गर्दीच्या विविध ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, तिथे दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत. याकरीता ३० रुग्णवाहिका आणि ४० रायडर्स गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत.

 

आरोग्यसेवा आपल्या दारी अंतर्गत या अभियानाचा शुभारंभ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते फरासखाना पोलीस स्टेशन येथून झाला. यावेळी तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकाचे प्रमुख केतन देशपांडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, नगरसेवक धीरज घाटे, डाॅ. प्रसाद खंडागळे, मंगेश याळगी, विनायक कदम, मयूर दिवेकर, साई डोंगरे, सौरभ कदम, अभिषेक मारणे, सुशांत कडभणे, रोहन भालेराव, विशाल पानसुरीया, उपस्थित होते. डॉ. प्रियांक जावळे व त्यांची टीम उपक्रमात सक्रिय कार्यरत राहणार आहे.

 

पुनीत बालन म्हणाले, गणेशोत्सवात काम करणारे कार्यकर्ते एकत्र येवून काम करतात तेव्हा समाजातील समस्या दूर करता येतात.

 

डॉ. प्रियांक जावळे म्हणाले, ६ रुग्णवाहिकांपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. आज ३० रुग्णवाहिका आहेत. गणेशोत्सवात आजपर्यंत हजारो नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. गेल्यावर्षी विसर्जन मिरवणूकीत ३ रुग्णांना हृदयाचा त्रास होऊ लागला असताना त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मिरवणूकीतील रथावरून पडल्याने जखमी झालेल्या कार्यकर्त्यास देखील मदत करण्यात आली.

 

हेमंत जाधव म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने राज्यातील विविध भागातून गणेश भक्त पुण्यात येतात. अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहे. गरजूंनी १०८ नंबर वर संपर्क साधल्यास मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. फरासखाना पोलीस स्टेशन, बाबू गेनू, कसबा गणपती मंडळ, केसरीवाडा, गरुड गणपती, टिळक रस्ता, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक या ठिकाणी रुग्णवाहिका असणार आहे. भाविकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधा. डॉक्टर, नर्स, प्रथमोपचार, आपत्कालीन सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

 

नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. केतन देशपांडे यांनी आभार

मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments