आई-वडिलानंतर शिक्षकाचं मोठं योगदान असतं.पालकांनी पाल्यांना संस्कारक्षम तर,शिक्षकाने त्यांना विद्यार्जन केलं,म्हणजे देशाची भावी पिढी आदर्श व बुद्धिमान होऊन देशाचं नाव विश्वात अजरामर करेल,हे निश्चित.आज देशात मोठमोठे शास्त्रज्ञ, कायदेपंडित,डॉक्टर्स,
इंजिनियर,
कृषीतज्ज्ञ,नेते,उद्योजक,
आय ए एस,आय पी एस अधिकारी,पायलट हे आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत,त्यामागे
कमी-अधिक प्रमाणात शिक्षक-अध्यापकाचे योगदान असते,हे त्रिकाल सत्य आहे.वास्तविक पहाता, विद्यार्थ्याच्या भवितव्याचा खरा शिल्पकार शिक्षकच आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.शिक्षक हा खऱ्या अर्थानं सरस्वतीचा पुजारी आहे,असेच म्हणावे लागेल.वास्तवात *शिक्षक* ही फार मोठी बौद्धिक शक्ती आहे,जी अखिल
मानवजातीचे भवितव्य घडवते.मित्रहो,पहा…एका शिक्षकामध्ये एवढी प्रचंड गुणवत्ता असते की,तो बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाच्या *राष्ट्रपती* या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो,याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.थोर राष्ट्रशिक्षक व भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जयंती दिवस देशभरात केंद्र सरकारकडून *शिक्षक दिन* म्हणून साजरा केला जातो,ही गौरवास्पद गोष्ट आहे.अत: शिक्षक दिनानिमित्त देशातील समस्त शिक्षक-अध्यापकांना हार्दिक शुभेच्छा! आदरणीय गुरुजनांना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!💐🙏
डॉ.राधाकृष्णन यांनी शिक्षक या नात्याने सर्वदूर शिक्षणाचे महत्व वाढविले.*आदर्श नागरिक व त्यापरिने आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षकाची कटिबद्धता* याचा परिचय डॉ.राधाकृष्णन यांनी भारतीयांना करून दिला.शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल त्यांना
*राष्ट्र शिक्षक* हा किताब बहाल करण्यात आला.याशिवाय डॉ.राधाकृष्णन यांचे *शिक्षण व तत्त्वज्ञान* या क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल त्यांना *भारतरत्न* हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन केंद्र सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले.*पूर्व व पश्चिम भारताला जोडणारा दुवा* असा नामोल्लेख राधाकृष्णन यांचा आधुनिक
विचारवंतांमध्ये केला जातो. शुद्ध विचार,चारित्र्यसंपन्नता, संयमशिलता,निर्भयता,
सदाचार ह्या पंचसूत्रांच्या आधारावर शिक्षकांनी विद्यार्जनाचे उत्तरदायित्व पार पाडावे,असा मोलाचा उपदेश त्यांनी अध्यापक वर्गाला दिला.
आचार-विचारांनी विद्यार्थी हा
सर्वगुणसंपन्न व्हावा,हाच त्यांचा मूळ उद्देश होता.अशा महान शिक्षकाला आम्हा सर्वांचा *मानाचा मुजरा*
शिक्षक दिनाचे औचित्य
साधून विद्यार्जनसारखं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचे जीवन सुसह्य व्हावे,या उद्देशाने राज्य सरकारने त्यांना निवडणुकीची कामे व जनगणना अशी अशैक्षणिक कामे देऊ नयेत,जेणेकरून त्यांना शैक्षणिक कामांवर पूर्णतः लक्ष केंद्रित करता येईल.सरतेशेवटी त्यांच्यावर देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी आहे,हे सरकारने विसरता कामा नये.वरील द्वय कामे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना द्यावीत,त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा पुढील काळात राज्य निवडणूक आयोग अन् राज्य सरकारला उपयोग करता येऊ शकेल.इतकेच नव्हे तर,अशा अनुभवी बेरोजगारांना पुढे रोजगार-स्वयंरोजगार देताना प्राधान्यक्रम देण्यात यावा,त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास सरकारला मदत होईल.
महत्वाचे म्हणजे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत
अंमलबजावणी करावी,जेणेकरून शिक्षणाचे लोण समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकेल.सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने केंद्र व राज्य सरकारने शिक्षक-अध्यापकांना
उच्चकोटीचे आय.टी.चे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.त्यामुळे ते विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे पुरेपूर ज्ञान देऊ शकतील.शिक्षकांनी निव्वळ व्यावसायिक लाभासाठी *ट्युशन कल्चर* चा अवलंब न करता,विद्यार्थ्यांना वर्गातच उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन सर्वदृष्टीने सक्षम करावे.असं केल्याने आपण *विद्येचे पूजक* असल्याचे सिद्धीस येईल.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व पर्यावरणचे महत्व व उपयुक्तताबद्दल ज्ञानार्जन करावे.जेणेकरून ते मोठे झाल्यावर वृक्षप्रेमी अन् पर्यावरण रक्षक बनतील.विद्यार्थीदशेत मुला -मुलींच्या मनात शिक्षकांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवून
सर्वधर्मसमभावाची शिकवण द्यावी.त्यामुळे समाजात जातीय सलोखा,बंधुभाव अन् सौहार्दपूर्ण वातावरण प्रस्थापित होईल.
शिक्षणाचे व्यापारीकरण थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा,यासाठी केंद्र व राज्य सरकारने *डोनेशन*
देण्या-घेण्यावर कडक निर्बंध घालावेत.राज्यात काही शाळांमध्ये शिक्षकांचे
संख्याबळ कमी असते,त्यामुळे स्थायी शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडतो.यास्तव शिक्षकांची वेळोवेळी भरती करणे अगत्याचे आहे,याची कृपया राज्य सरकार अन्
संस्थाचालकांनी नोंद घ्यावी.विद्यार्थी हा
अनुकरणप्रिय समाज घटक असल्याने,शिक्षकांनी तंबाखू सेवनसारख्या वाईट सवयींपासून कोसो दूर रहावे.सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सध्याच्या काळात काही शाळा-कॉलेजांमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या,ही शिक्षणसारख्या पवित्र क्षेत्रावर काळीमा फासणारी गोष्ट आहे.या पार्श्वभूमीवर अशा वाईट घटना पुनश्च घडू नयेत,यासाठी सरकार अन् शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे ठोस पावलं उचलून अशा असभ्य व अनैतिक कारवायांना
कायमस्वरुपी पायबंद घालावा.आजच्या दिनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,रवींद्रनाथ टागोर, सानेगुरुजी,धोंडो केशव कर्वे या थोर शिक्षकांचे स्मरण करणे क्रमप्राप्तच ठरते.कारण या
शिक्षणमहर्षींनी देखील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे.*दर्जेदार शिक्षण देणारा देश,अशी जगात भारताची प्रतिमा असावी* हे डॉ.राधाकृष्णन यांचे स्वप्न साकार करणे,म्हणजे हीच खरी शिक्षण दिन साजरा करण्याची फलश्रुती होय.
*लेखक-रणवीर राजपूत