पुणे दिनांक ५ सप्टेंबर २०२४: खेळाडू व क्रीडा क्षेत्राचा विकास करणे ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट असते. हे आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारित पुण्याच्या क्रीडा पत्रकारांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या क्रीडा विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी येथे सांगितले.
स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई, महाराष्ट्रतर्फे (एसजेएएम) पुण्यातील ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हॅरी डेव्हिड यांचा बोर्डे व माजी डेव्हीसपटू व भारतीय टेनिस संघाचे माजी प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या हस्ते भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाचे (एसजेएफआय) सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या समारंभात बोर्डे पुढे म्हणाले, गेल्या ४०-५० वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत आणि या बदलास धैर्याने सामोरे जात असताना क्रीडा पत्रकारांनीही या बदलास अनुसरून वार्तांकन करीत खेळाडूंचे नाव मोठे केले आहे. क्रीडा पत्रकारांनी केलेल्या सकारात्मक टीकेमुळेच खेळाडूंची प्रगती होत असते.
नंदन बाळ यांनीही बोर्डे यांच्या मतास अनुकूलता दर्शवित सांगितले,” क्रीडा पत्रकारांनी प्रत्यक्ष खेळाडू, संघटक प्रशिक्षक अशा वेगवेगळ्या घटकांशी वैयक्तिकरित्या सातत्याने संपर्क ठेवीत क्रीडा बातमीदारी केली आहे. त्याचा फायदा सर्वच खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित घटकांना झाला आहे.
सत्कारास उत्तर देताना डेव्हिड यांनी सांगितले, ” हल्लीच्या तुलनेमध्ये आमच्या काळामध्ये क्रीडा पत्रकारांना अतिशय अल्प मानधन मिळत असे पण त्यावर समाधान मानून आपण क्रीडा क्षेत्राची सेवा करीत आहोत हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आमच्या वेळच्या पत्रकारांनी देशाचा क्रीडा विकास कसा होईल हेच पाहिले आहे. ही सेवा करताना आम्हाला देखील अतिशय आनंद आणि समाधान मिळाले.