पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दिनांक २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. प. पू. श्री कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील व खेळाडू रेश्मा पुणेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी केली.
दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्षी आयोजित लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर, ज्येष्ठ साहित्यिका डॉ.माधवी वैद्य आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, मंदिराच्या संस्स्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी ट्रस्ट तर्फे प्रतीवर्षी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, कला, क्रिडा, पत्रकारीता तसेच वैय्यक्तिक निपुणता या विविध क्षेत्रातील एकून तीन कर्तुत्ववान महिलांचा व संस्थांचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते. या वर्षी धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प. पू. कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन या मातृसंस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार संस्थेतर्फे प्रमुख विश्वस्त चैतन्यदादा मल्लापूरकर हे स्वीकारणार आहेत.
पत्रकारितेमध्ये गुन्हेगारी या अत्यंत धोकादायक क्षेत्रातील नितांत धडाडीच्या महिला पत्रकार अर्चना मोरे पाटील यांना देण्यात येणार आहे. आपल्या सुमारे १८ वर्षांच्या पत्रकारीतेमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम करीत असताना घटनेचा सखोल मागोवा व पाठपुरावा करून निर्भीडपणे बातमी प्रकाशित करण्याचा आपला यशस्वी प्रयास स्पृहणीय आहे.
रेश्मा पुणेकर ही राष्ट्रीय महिला बेसबॉल संघाची कप्तान आहे. लहानपणी बक-या चारणारी बारामतीची रेश्मा हीची भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिने अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व केले आहे. नुकताच तिला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला अत्यंत सुप्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार देखील मिळाला आहे.


