Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*शासकीय कार्यालयांमध्ये मतदार जनजागृती मंच स्थापना करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे...

*शासकीय कार्यालयांमध्ये मतदार जनजागृती मंच स्थापना करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश*

पुणे, दि.२४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात एका मतदार समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच मतदार जनजागृती मंचाची (व्हीएएफ) स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

मा. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हा उपक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील मतदार यादीत महिलांची मतदार नोंदणी वाढविण्यासोबतच मतदारांमध्ये मतदानाच्या कर्तव्याबाबत जनजागृती करण्याकरीता कार्यालयात मतदार जागृती उपक्रमांचे, शिबिरांचे आयोजन करावे. फ्लेक्स, बॅनर, पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा आदीमार्फत जनजागृती करावी. याकरीता मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार लोगो, टॅग लाईन्सचा वापर सर्व प्रचार साहित्यांमध्ये (टिव्हीसीएस, प्रिंट, पोस्टर, बॅनर, रेडिओ) करावा.

मतदान जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रसिद्धी देण्यात यावी. संबंधित ठिकाणाचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून बोलविण्यात यावे. आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मतदार यादीमध्ये वोटर हेल्पलाईन ॲपवर नाव तपासून घ्यावे. त्यांना मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याकरिता जनजागृती करावी.

आपले अधिनस्त कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवयुवा मतदार अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करावा. सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी १०० टक्के मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होवून मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतील, याबाबत दक्षता घ्यावी. या उपक्रमाबाबत मिळालेल्या प्रतिसादाबाबतचा फोटोसहित अहवाल slaopune13@gmail.com या ई-मेलवर पाठवावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी निर्देश दिले आहेत.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments