Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण...

विशेष गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील ‘आयएसडीएस’ तर्फे पहिला उपक्रम

पुणे, दि. १० डिसेंबर २०२४ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या शाश्वतता व विकास अध्यापन संस्थेने (आयएसडीएस) विशेष गरज असलेल्या व्यक्तींसाठी (न्यूरोडायव्हर्जंट) एक स्वतंत्र विभाग प्रथमच सुरू केला आहे. त्यामध्ये गणल्या जाणाऱ्या मतिमंद, गतीमंद, चंचल आणि स्वमग्न व्यक्तींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणारी कार्यशाळा अशा १२ किशोरवयीन मुलांसाठी आयोजित करण्यात आली. निमित्त होते ते नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध विशेष व्यक्तींच्या प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनिता लेले यांनी केले. या कार्यशाळेला आयएसडीएसच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जोशी यांनी सहकार्य केले असून विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या पारूल कुमठा यावेळी उपस्थित होत्या. या मुलांनी जमिनीत रुजवण्यासाठी बिया घातलेले मातीचे गोळे (सीड बाँल) तयार केले. तसेच त्याची विक्रीही करण्यात आली. मुलांच्या पालकांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत प्रा. निधी दीक्षित, प्रा. सौरभ साबळे आणि डॉ. सुजाता मेहता यांनी मार्गदर्शन केले.

उद्घाटन करताना लेले म्हणाल्या की, अशा व्यक्तींसाठी विशेष अभ्यासक्रम बनवताना त्यांची आवड व कल लक्षात घ्यावा लागतो. त्या आधारे मग व्यावसायिक प्रशिक्षण राबवणे शक्य होते.

डॉ.जोशी म्हणाल्या की, आयएसडीएसमध्ये सर्वांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी ही एक यशस्वी सुरूवात आहे. अशा मुलांची क्षमता ओळखून त्यांना संयमाने शिकवावे लागते. संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेल्या १७ शाश्वत उद्दीष्टांमध्ये समाजातील असमानता नष्ट करून सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क आहे, असे त्या म्हणाल्या.

सर्वांसाठी शिक्षण हे आता मान्य झाले असून विशेष गरज असलेल्या व्यक्तींना त्यात सामावून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे आयएसडीएसचे संचालक आणि डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments