पुणे ः अध्यात्मातून सर्व जगाचे कल्याण होणार आहे आणि हे अध्यात्म वेद विद्येत आहे. आज पर्यंत अनेक पोथी आणि ग्रंथातातून ही विद्या मिळवता येते. परंतु, अशी एकही आदर्श पोथी किंवा ग्रंथ नाही की, ज्यामध्ये एकही चूक नाही. म्हणून गुरू शिष्य परंपरेला शरण जावून वेदाचे पारायण करणे व ते कंठस्थ असले पाहिजे. त्यामुळे ग्रंथांचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे, असे प्रतिपादन वेदाचार्य शांताराम भानोसे यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैदिक संशोधन मंडळ पुणे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी, वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे, आहिताग्नी सुधाकर कुलकर्णी, अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात आले. यावेळी वेदविद्या शिकणाऱ्या ५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी आणि १२ वी तील विद्यार्थ्यांना प्रातिधिनिक स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले.
शांताराम भानोसे म्हणाले, वेद हे जगातील आद्य वाड्.मय असून ते जगाच्या कल्याणासाठी सांगितले आहे. त्याचा योग्य अभ्यास केला तर राष्ट्राचे कल्याण होईल आणि भारताचे जगात विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. गुरू शिष्य परंपरेची ही वैदिक विद्या लोप पावत आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि वेदांचा अभ्यास करणाऱ्यांना, वेदपाठ शाळांना अनुदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले पाहिजे.
सुब्रह्मण्यम वेरीवेंटी म्हणाले, वेद विद्या किंवा इतर कोणतीही विद्या असो त्यातील विद्या हा शब्द महत्वाचा आहे. विद्या या शब्दाचे गुरू, शिष्य, विषय आणि अध्ययन हे चार स्तंभ महत्वाचे आहेत. भगवत गीतेचे महत्व सांगताना ते म्हणाले, भगवत गीता ही शिष्याने गुरू समोर कसे वागायचे हे सांगणारे व्यवस्थापन तंत्र आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देत नविन वास्तू स्थापने विषयीची माहिती दिली. श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. रवींद्र मुळे यांनी प्रास्ताविक केले आणि वैदिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.