– भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी…

तारां कित Avatar

पिंपरी, दि.२५ जानेवारी २०२५ :- विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजाळून निघाल्या, रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी कार्यालयांचा परिसर नटला आहे. ७६ वा प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरले असून महापालिकेने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महापालिकेची पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळून निघाली आहे. तसेच सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींना देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दि २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महापालिकेच्या मुख्य भवनामध्ये ध्वजारोहण होणार आहे. महापालिकेचे सुरक्षारक्षक दल, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वतीने पथ संचलन करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे देशभक्तीपर गीत्तांचा कार्यक्रम आणि सायं. ५:३० वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील मैदानात “हम भारत के लोग” या संविधानावर आधारित गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, मल्याळम, भोजपुरी, कन्नड, उर्दु, संस्कृत, नेपाळी, कोकणी, पाली आदी विविध १५ भाषांमध्ये संविधानाची प्रस्ताविका गायनाने भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यात येणार असून याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचीही महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य रंगमंच, दैदिप्यमान प्रकाशयोजना, उपस्थितांसाठी बैठक व्यवस्था, भव्य एलईडी स्क्रीन शिवाय या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबूक आणि युट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar