पिंपरी, दि.३० जानेवारी २०२५:-* सत्य, अहिंसा ही मूल्य समाजात रुजवत ग्रामीण विकास, स्वच्छतेसह सर्वसमावेशक समाजाच्या उभारणीवर महात्मा गांधी यांनी भर दिला. आजच्या काळातही त्यांचे विचार आणि तत्त्वे समाजाला दिशादर्शक आहेत, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, स्वप्नील भालेराव, उपलेखापाल अनिल कु-हाडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिश सत्तेला हादरे दिले. त्यांनी सत्य, अहिंसा मूल्य समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच स्वच्छता, ग्रामीण विकास, स्वयंनिर्भरता आणि सर्वसमावेशक समाजाच्या उभारणीवर भर दिला. आजच्या काळातही त्यांचे विचार आणि तत्त्वे समाजाला दिशा दाखवतात. महात्मा गांधी यांच्या विचारांचे आचरण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असेही इंदलकर म्हणाले
.


