पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान मंदिरात हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक उपक्रमांतर्गत पुण्यातील हुजूरपागा मुलींची शाळा, रेणुका स्वरुप हायस्कूल, विद्या विकास विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, मॉडर्न हायस्कूल, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ.विमलाबाई गरवारे हायस्कूल या शाळांमधील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यांचे शैक्षणिक शुल्क ट्रस्टतर्फे भरण्यात येणार असून शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता मंदिरात होणा-या या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, उत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. रविवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू या उत्सवमूर्तींची धान्य तुला होणार असून हे साहित्य किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत हे धान्य देण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल आणि रजत कमल अर्चना म्हणजेच उत्सवमूर्तींना सोन्याची व चांदीची फुले अर्पण करण्यात येतील.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


