पुणे, दि. 28 : ‘अन्वेषणम’ या आंतरमहाविद्यालयीन अभ्यास दौरा सादरीकरण स्पर्धेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ अर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय क्रमांक भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला मिळाला. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पुणे व नाशिकमधील बारा आर्किटेक्चर महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बीएनसीएच्या पाच विद्यार्थिनींनी सादरीकरण करताना राजस्थानमधील पुष्कर येथील मानवी वसाहतीसंबंधीचे पंधरा मिनिटांचे सादरीकरण करताना माहिती दर्शवणारे मोठे तक्ते आणि त्रिमिती प्रतिकृतींचा (मॉडेल्स) प्रभावी वापर केला. या सादरीकरणात बीएनसीएच्या देवकी मानधने, ईशा जागडे, मधुरा फडणीस, मोहिनी मांडके आणि साक्षी पटेल यांचा सहभाग होता. त्यांना प्रा. कांचन अतनूरकर आणि प्रा. महेष बांगड, तसेच बीएनसीएतील स्टूडिओ टूडी मधील डॉ. पूर्वा कुलकर्णी आणि प्रा. नीरजा हिंगणे तसेच प्रा. सायली अंधारे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी डॉ. स्वप्नील सेठ, प्रा. मुक्ता लाटकर, आर्किटेक्ट आनंद उकीडवे, प्रा. अनिता जोशी आणि प्रा. अवंती गोळे यांनी परीक्षण केले. स्पर्धेतील संकल्पनेची बीएनसीएच्या विद्यार्थिनींनी सादरीकरणात दाखवलेली उत्तम समज वाखाणण्यासारखी होती, असे परीक्षकांनी सांगितले.
स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप आणि सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य डॉ. बनानी बॅनर्जी यांनी विजयी विद्यार्थिनींचेे अभिनंदन केले.
यानिमित्त विजयी संघाने सादर केलेल्या राजस्थानमधील पुष्कर येथील मानवी वसाहतींसंबंधीच्या तक्ते व प्रतिकृतींचे प्रदर्शन बीएनसीएमध्ये आयोजित केले. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध आर्किटेक्ट गिरीश दोशी अणि फ्रेच दूतावासाच्या प्रतिनिधी डॉ. फिलीपे मौरिन यांच्या हस्ते करण्यात आले.


