Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपाधींपलीकडचे आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा' जगद्गुरू शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज...

उपाधींपलीकडचे आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा’ जगद्गुरू शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे प्रतिपादन ‘वेदयुक्त – दर्शन, विज्ञान आणि व्यवहार’ या विषयावरील धर्मसभेत केले मार्गदर्शन

पुणे – ‘प्रत्येक संज्ञा, विषय ज्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात, ते शब्द, त्या संज्ञा अखेरीस विशिष्ट ज्ञानाकडे निर्देश करत असतात. त्यामुळे ज्ञानाकडे नेणाऱ्या शब्दांच्या, संज्ञांच्या वाटांचा स्वीकार करा. सगळे भेद, विरोध उपाधींमुळे आपल्याला जाणवतात. उपाधीपलीकडचे आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन जगन्नाथपुरी येथील श्री गोवर्धन पीठाचे प. पू. जगद्गुरू शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी गुरुवारी येथे आयोजित  ‘वेदयुक्त दर्शन, विज्ञान आणि व्यवहार’, या विषयावरी धर्मसभेत ते मार्गदर्शन करत होते.  जगन्नाथपुरी येथील श्री गोवर्धन पीठाच्या आदित्य- आनंद वाहिनी तर्फे लाॅ काॅलेज रस्त्यावरील शांतिशीला क्रीडा संकुल येथे  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जगद्गुरू शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज  म्हणाले ‘आपल्याला जगात वावरताना व्यावहारिक पातळीवर अनेक भेद, फरक दिसतात. हे भेद उपाधींमुळे असतात. प्रत्यक्षात प्रत्येकाचे आत्मतत्त्व एकच असते. आत्मा सर्वव्यापी असतो. त्यामुळे व्यावहारिक पातळ्यांपुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाने त्यापुढील पातळी गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगून श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, ‘ब्रह्मा, विष्णु, महेश यांना आपण प्रतीकरूपाने निर्मिती, पालन आणि संहार, यांचे निदर्शक मानतो. पण तिथेही तत्त्व एकच आहे. ते शिव तत्त्व आहे. तेच सर्वत्र आहे. संज्ञा निरनिराळ्या असल्या तरी तत्त्व बदलत नाही. सर्वसामान्यांसाठी भक्तीची वाट संतांनी सांगितली आहे. सांख्य, न्याय, वैशेषिक अशा विविध विचारप्रणालींनी मार्ग भिन्न निवडले, पण त्यांचेही तत्त्व एकच आहे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या चारही वाणींतून नामाचे अर्थानुसंधान घडते तेव्हा भवसिंधु आनंद सिंधू मध्ये परिणत होतो. व्यवहार, विज्ञानाच्या भौतिक पातळ्या मागे पडतात आणि मनुष्य आध्यात्मिक पातळीवर उन्नयत करू शकतो’.

‘धर्माचरण न करणे यालाच नामापराध म्हटले जाते. दुसर्‍याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते, तसे आपण आधी दुसर्‍याशी वागले पाहिजे, यातून विश्वबंधुत्व वाढीस लागेल. आधुनिक काळात घराबाहेरचे शिक्षण व्यावहारिक आहे. घरात, कुटुंबात मूल्ये, संस्कार, नीति यांचे आदर्श दिसले पाहिजेत. तेव्हाच स्तुती-निंदा, आपला – परका, हे भेद नाहीसे होतील. यंत्रां-तंत्रांच्या आपण जितके अधीन होऊ, तितके बहिर्मुख राहू. आपल्याला अंतर्मुखतेचा प्रवास करायचा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे’, असेही ते म्हणाले.
पंडित वसंतराव गाडगीळ यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला व प्रास्ताविक केले.
श्रोत्यांना सुरवातीपासून प्रश्न, शंका विचारायला प्रवृत्त करून त्यांनी मोक्ष, वेद, उपनिषदे, पुराणे, शैव, वैष्णव आदी पंथ, पुनर्जन्म, वेदप्रामाण्य, संचित कर्म, फळाची अपेक्षा, अवतार संकल्पना..अशा अनेक संज्ञा-संकल्पनांचे स्पष्टीकरण केले. नजिकच्या काळात शिक्षण, रक्षण, अर्थकारण आणि हितकारण करणारे प्रशासन मिळेल, असेही ते म्हणाले. धर्मसभेनंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments