Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हीलचेअरवरून महामानवांना मानवंदना – ‘मिरॅकल ऑन व्हील्स’चा सृजनात्मक नृत्यसंगीत कार्यक्रम पिंपरीत होणार...

व्हीलचेअरवरून महामानवांना मानवंदना – ‘मिरॅकल ऑन व्हील्स’चा सृजनात्मक नृत्यसंगीत कार्यक्रम पिंपरीत होणार सादर

पिंपरी, दि. १३ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये सोमवार दि. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. पाशा यांच्या दिव्यांग कलाकारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नृत्य संगीतमय विश्वातील अविस्मरणीय कलाविष्कार ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स या नृत्य संगीतमय अविष्कार असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व संकल्पना राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध थेरप्युटिक थिएटर दिग्दर्शक डॉ. सैयद सलाहुद्दीन पाशा यांची आहे. डॉ. पाशा हे “फादर ऑफ इंडियन थेरप्युटिक थिएटर फॉर दिव्यांग” म्हणून ओळखले जातात. त्यांनी शारीरिक व मानसिक दिव्यांगांसाठी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून थेरपी आणि सृजनात्मक अभिव्यक्तीचे एक आगळेवेगळे व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यांच्या “मिरॅकल ऑन व्हील्स” या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील दिव्यांग कलाकार व्हीलचेअरवर भरतनाट्यम व कथ्थकसारखी शास्त्रीय नृत्ये सादर करतात. त्यांनी राष्ट्रपती भवन, ताज महोत्सव यांसारख्या मान्यवर मंचांवर १०,००० हून अधिक सादरीकरणे केली आहेत.

 

महापालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वानिमित्त सादर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, स्वातंत्र्याच्या व सशक्तीकरणाच्या विचारांना सृजनात्मक अभिव्यक्ती मिळणार आहे. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक सादरीकरण नसून, दिव्यांगांच्या असिम क्षमतेचे आणि मानवी स्पंदनांचे सशक्त दर्शन ठरणार आहे. दोन भागांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पहिल्या भागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुसऱ्या भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय तसेच प्रेरणादायी जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येते.

 

 

 

चौकट – मिरॅकल ऑन व्हील्स टीमचा परिचय:

 

· भारतभरातून निवडलेले २०० हून अधिक दिव्यांग कलाकार.

 

· सर्व कलाकार व्हीलचेअरवर बसून भरतनाट्यम, कथकसारखी शास्त्रीय नृत्ये सादर करतात.

 

· यापूर्वी राष्ट्रपती भवन, ताज महोत्सव, आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दिव्यांग बांधवांसाठी सादर करण्यात आलेल्या ‘पर्पल जल्लोष’ अशा विविध मान्यवर मंचांवर त्यांनी आपली कला सादर केली आहे.

 

· सादरीकरणातून सामाजिक समावेश, स्वावलंबन व परिवर्तन यांचे प्रभावी संदेश त्यांनी दिले आहेत ज्यामुळे अनेक दिव्यांगांना प्रेरणा मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments