पुणे, १० मे २०२५ – भारतातील आघाडीचा स्कूल एडटेक ब्रँड लीड समूहा तर्फे आज पुण्यात ‘शिक्षा पुरस्कार २०२४–२५’ च्या तिसऱ्या पर्वाचा पश्चिम आणि पूर्व विभागासाठीचा पुरस्कार समारंभ यशस्वीपणे पार पडला. हा पुरस्कार समारंभ देशातील सर्वात मोठ्या शालेय पुरस्कारांपैकी एक असून तीन शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालिकेतील दुसरा सोहळा होता. लीड समूहाच्या ‘शिक्षा पुरस्कारां’तून भारतभरातील अशा उत्कृष्ट शाळांचे प्रमुख व शिक्षकांचा गौरव केला जातो जे शिक्षणातील गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अमूल्य योगदान देत आहेत.
स्थान किंवा शाळेच्या आकाराकडे दुर्लक्ष करून, अशा शाळांना गौरवण्यात आले आहे ज्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याशी (NCF) सुसंगत, बहुआयामी अध्यापन-शिकवणी पद्धती प्रभावीपणे राबवत आहेत — त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, नियोजन, निरीक्षण आणि योग्यवेळी सुधारणा यावर भर देण्यात आलेला आहे.
२०२४–२५ मध्ये लीड समूहाच्या ‘शिक्षा पुरस्कारां’मध्ये २,९०० हून अधिक शाळा व २९,००० पेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले. राष्ट्रीय, प्रादेशिक (झोनल) आणि राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये शाळांना गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, तसेच पालकांचा शैक्षणिक सहभाग वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या परिषदांसारख्या उपक्रमांमुळे या शाळांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
लीड समूहाच्या या उपक्रमात देशभरातील ३,००० हून अधिक शालेय नेते व शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र व गुजरातमधील २५ शाळांचे प्रतिनिधी सहभागी होते.
लीड समूहाचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मेहता म्हणाले, “शाळा या भारताच्या भविष्याचा पाया आहेत आणि ‘शिक्षा पुरस्कार’ अशा संस्था व व्यक्तींना सलाम करतात ज्या शिक्षणात सातत्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेतात. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन — तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात बदल घडवत आहात. नवोन्मेष आणि समर्पणाच्या बळावर आपण प्रत्येक मुलासाठी शिक्षण परिणाम अधिक चांगले करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”


