पुणे
दिनांक ३० मे
(क्रीडा प्रतिनिधी)
“फिटनेस फॉर ऑल ,खेलो इंडिया गेम्स यासारख्या चांगल्या व दूरगामी योजनांमुळेच आपल्या देशात गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक व पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली आहे” असे राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.
क्रीडा भारती संस्थेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा जिजामाता पुरस्काराने क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे व तेनसिंग नोर्गे सन्मानित गिर्यारोहक व संघटक उमेश झिरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. भरणे पुढे म्हणाले की “महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. राज्य शासन नेहमीच खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी सर्वतोपदी प्रयत्न करीत असते आणि यापुढेही करणार आहे.
प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचा आणि कष्टाचा मोठा वाटा असतो मात्र आई-वडील कायमच प्रसिद्धीपरान्मुख असतात”. “खेळाडूंच्या पालकांचा सत्कार करीत क्रीडाभारतीने सर्वांपुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे” असे सांगून झिरपे म्हणाले की “क्रीडाक्षेत्र हे करिअरसाठी उत्तम क्षेत्र झाले असून गिर्यारोहण क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.”
श्री राज चौधरी यांनी जिजाऊंचे कर्तृत्व आणि खेळाडूंच्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने गौरव यामागील भूमिका विषद केली.
यंदाच्या जिजामाता पुरस्कार विजेत्यांमध्ये कुस्तीगीर अमोल बराटे याची आई श्रीमती चंदा, कबड्डीपटू आम्रपाली गलांडे यांची आई सुरेखा,वुशूपटू कल्याणी जोशी हिची आई अनुराधा, बुद्धिबळपटू आदित्य सामंत याची आई संध्या, स्केटिंगपटू श्रुतिका सरोदे हिची आई रंजना, मॉडर्न पेन्टथलॉन खेळाडू विराज परदेशी याची आई बेला, ॲथलेटिक्स खेळाडू यमुना लडकत हिची आई सुनंदा, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे याची आई भाग्यश्री, योगासनपटू नितीन पवळे याची आई जयश्री, प्रस्तारोहण खेळाडू सानिया शेख हिची आई निगर, तायक्वांदोपटू कोमल घारे सुरेखा,अश्व रोहन खेळाडू आशिष लिमये याची आई डॉक्टर विमला, यांचा समावेश होता. याच कार्यक्रमामध्ये युवा खेळाडू सान्वी गोसावी (टेनिस),सिद्धी जाधव (टेनिक्वाईट),आरूष जोशी (क्रिकेट), कार्तिकी राक्षे (बॉलबॅडमिंटन),आदित्य गाडे (ॲथलेटिक्स), गार्गी भट (योगासन) यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संघटक शरदराव गोडसे यांना क्रीडा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या क्रीडा भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या श्रीमती शकुंतला खटावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी शरदराव गोडसे तसेच सत्कारार्थींतर्फे अनुराधा जोशी व भाग्यश्री हर्षे यांनीही आपले विचार व्यक्त केले.प्रा.शैलेश आपटे यांनी प्रास्ताविक केले तर विजय राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनुजा दाभाडे,जयसिंग जगताप, मनाली देव यांनी केले.
–______________________


