Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदुजा फाउंडेशन आणि डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; शिर्डीमध्ये वंचित...

हिंदुजा फाउंडेशन आणि डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; शिर्डीमध्ये वंचित महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी उपक्रम · अत्यंत गरीब १०,००० महिलांची गर्भाशयमुख व स्तन कर्करोगासाठी तपासणी डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट

शिर्डी, ९ जून २०२५ – ग्रामीण महाराष्ट्रातील वंचित महिलांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने, ११० वर्षांचा वारसा असलेल्या हिंदुजा ग्रुपची परोपकारी शाखा हिंदुजा फाउंडेशन, हिने अहमदनगरस्थित प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था डॉ. माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर हिच्याशी सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीतून शिर्डीमध्ये आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२५पर्यंत १०,००० अत्यंत गरीब महिलांची गर्भाशय मुख (सर्व्हायकल) व स्तन कर्करोगासाठी तपासणी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत पहिले तपासणी शिबीर ८ जून रोजी शिर्डीपासून ६० किमी अंतरावरील राहुरी येथे पार पडले. तेथे सुमारे ३५० महिलांची तपासणी करण्यात आली.

कर्करोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचार हे उद्दिष्ट या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. वंचित समुदायांना आर्थिक अडचणी व भौगोलिक मर्यादांमुळे अशा तपासण्या करून घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून ही तफावत भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे.

या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्याकडे असून, त्यांना स्थानिक जनजागृती उपक्रमांचे पाठबळ देण्यात येत आहे. सर्व महिलांची ‘पॅप स्मीअर’ तपासणी व ‘क्लिनिकल ब्रेस्ट एग्झॅमिनेशन’ केली जाईल. गरज असल्यास, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल यांच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या सूकाणू समितीच्या सदस्या नम्रता हिंदुजा म्हणाल्या, “महिलांना आरोग्याच्या माध्यमातून सशक्त करणे हे बळकट समाजनिर्मितीचे मूलभूत पाऊल आहे. आरोग्यसेवेत असलेली तफावत भरून काढणे आणि कोणतीही स्त्री केवळ तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे, ही आमची ठाम बांधिलकी आहे.”

‘हिंदुजा फाउंडेशन’चे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “भारतात कर्करोगाचे वेगाने वाढणारे प्रमाण ही मोठीच चिंतेची बाब आहे. २०२५मध्ये देशात कर्करोगाचे १७ लाखांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले गेले असून, २०३०पर्यंत ही संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. तपासणीच्या माध्यमातून लवकर निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी ठेवता येतो आणि बरे होण्याची शक्यता वाढते. आमचा हा उपक्रम केवळ रोगाचे निदान व उपचार यांपुरता मर्यादित नसून, तो जनजागृती, सशक्तीकरण व प्रतिबंधात्मक आरोग्य संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. आम्ही अशा वंचित समुदायांमध्ये दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

शिबिरामध्ये ज्या महिलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळतील, त्यांना राहुरी येथील ‘डॉ. माने चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये मोफत उपचार दिले जातील. याचबरोबर, स्थानिक आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून आरोग्यव्यवस्थेची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे.

‘रिलायन्स लाईफ इन्शुरन्स’च्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम सध्या शिर्डीमध्ये राबवला जात आहे. लवकरच उस्मानाबाद आणि अहिल्यानगर या कर्करोगाच्या दृष्टीने संवेदनशील जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम विस्तारण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments