Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १६: अनेक अधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. आपण स्वतःदेखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील निघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, सरपंच सुनीता येळवंडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी बालकांना बोट धरून नेले शाळेत..!

या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणार्या बालकांना विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बोट धरून शाळेत नेले. असा अनोखा अनुभव मिळाल्याने त्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेचा हा आनंददायी प्रवेश बालकांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण ठरला.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यावेळी म्हणाले, शाळा, ग्रामस्थ आणि पालक यांची एकत्रित भूमिका शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. या कामात निघोजे येथील ग्रामस्थांचा भरीव सहभाग आहे. येथे भविष्यात व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. पाटील म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ, फुगे व फुले देऊन आनंददायी वातावरणात नव्या वर्षाची सुरुवात करण्यात आली. नववी-दहावीच्या वर्गांचे उद्घाटन आणि कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत किचनशेडचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

नववीच्या वर्गांची सुरुवात

निघोजे शाळेची एकूण पटसंख्या ८३६ असून, यापुढे मुलींना नववी व दहावीच्या शिक्षणासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही. हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील निघोजे, गलांडवाडी व धानोरे या तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गांना मान्यता दिली आहे. ही बाब महाराष्ट्रात प्रथमच घडली असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments