Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला सेवा मंडळ, डॉ. जयश्री तोडकर, स्वाती ओतारी यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार...

महिला सेवा मंडळ, डॉ. जयश्री तोडकर, स्वाती ओतारी यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार जाहीर* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा ; मंदिराच्या १२८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून घोषणा

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार निराधार मुली आणि परित्यक्त महिलांसाठी तसेच अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणा-या ‘महिला सेवा मंडळ’ या संस्थेला तसेच लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रियेसाठी जगद्विख्यात ओबेसिटी तज्ञ डॉ. जयश्री तोडकर आणि विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणाऱ्या वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. हे पुरस्कार मंदिराच्या गुरुपौर्णिमा उत्सवात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे म्हणाल्या, मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांची स्मृती चिरंतन रहावी, यासाठी ट्रस्ट तर्फे प्रतीवर्षी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, कला, क्रिडा, पत्रकारीता तसेच वैयक्तिक निपुणता या विविध क्षेत्रातील एकूण तीन कर्तृत्ववान महिलांचा व संस्थांचा ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते. या वर्षी महिला व बालकल्याण क्षेत्रातील समर्पित कायार्साठी महिला सेवा मंडळ या संस्थेला देण्यात येणार आहे. मंडळ संचलित कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम संस्था कर्वे रस्ता येथे ८४ वषार्पासून कार्यरत आहे.

दुस-या पुरस्कारार्थी डॉ. जयश्री तोडकर या प्रख्यात शल्यविशारद असून लेप्रोस्कोपिक व बॅरिएट्रिक सर्जरी तज्ञ म्हणून १९९५ पासून जगप्रसिद्ध आहेत. लठ्ठपणाविषयी आणि डायबिटीस, ब्लड प्रेशर इत्यादी गंभीर आजारांविषयी सामाजिक जागृती त्या करीत असतात. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देखील मिळाले आहेत.

तिस-या पुरस्कारार्थी स्वाती ओतारी या पुरातन मूर्तींना झळाळी देत त्यांचे मूळ रूप पुन:र्प्राप्त करून देण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील अनेक मंदिरातील मूर्तींवर तयार झालेले शेंदूर लेपन काढून तसेच विरूपित झालेल्या पाषाण शिल्पांना मूळ स्वरूपात समोर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. महिला कारागीर म्हणून त्यांचे हे काम वज्रलेपन क्षेत्रात अत्यंत वेगळे असून याकरता त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

मंदिराच्या १२८ व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी श्री दत्त महाराजांची सालंकृत पूजा करण्यात आली. प्रियांका व अश्विनीकुमार कायस्थ हलवाई यांचे हस्ते लघुरुद्र करण्यात आला. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त संगणकीकृत देणगी पावती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईलसूत्रा टेक्नॉलॉजीचे संजय आठवले यांनी टेम्पल कीआॅस्क प्रणालीद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेब डिजिटल कंपनीचे भागीदार शुभम जाना यांनी संगणकीकृत अभिषेक व देणगी पावतीसाठी लागणारे लेनोवो कंपनीचे दोन टॅब देणगी दिले. देणगीदार संस्थेचे भागीदार मंगेश व सुवर्णा येरवा, विश्वेश देवधर आणि शुभम राजेंद्र जाना व कुटुंबीय यांचे उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी क्यू आर कोडचे तर कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचे शुभ हस्ते या टॅब्स चा लोकार्पण समारंभ मंदिरात संपन्न झाला. मंदिरात दिवसभर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments