पुणे : पाण्यात होणाऱ्या सौम्य हालचाली…आसनासोबत होणारे मंत्रोच्चार… सूर्यनमस्कारातून होणाऱ्या पाण्यातील सौंदर्यपूर्ण हालचाली सोबतच वीरासन, पतंगासन, ताडासन, वृक्षासन अशी विविध आसने योगाभ्यासकांनी निळ्याशार तलावात सादर केली. विठ्ठल-विठ्ठल च्या गजरात होणारा नादयोग करीत योग सोबत भक्ती योग योगाभ्यासकांनी साकारला. ३६५ दिवस योगाची सामूहिक शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
एम फिटनेस सेंटरच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त अॅक्वा योगाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरा शेजारील नांदे तलावात करण्यात आले होते. यावेळी प्रिस्टीन ग्रुपचे प्रीतम गोयल, पुना दाल बेसन मिलचे सुरज पारख, सिलेक्ट मीडियाच्या मैथिली पागे कदम, नेशन फिफ्टी टू चे अभिषेक जाधव, सेवेन नोट चे अजय सीके, गोल्डन आर्ट्सचे अशोक पवार, एम फिटनेस अँड योग थेरपी सेंटरच्या संचालिका मनाली मगर कदम, सोनाली मगर, प्रशिक्षक चंद्रकांत मगर उपस्थित होते. ‘अॅक्वा सूर्यनमस्कार’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
मनाली मगर म्हणाल्या, योग म्हणजे तात्पुरती क्रिया नव्हे, ती जीवन जगण्याची शुद्ध, सजग आणि सुसंवादात्मक पद्धत आहे. पाण्यामध्ये निसर्गाच्या अधिक जवळ आपण जातो. त्यामुळे पाण्यातील योगा सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि त्याचे फायदेही अनेक आहेत, असेही त्यांनी सांगितले. अॅक्वा रिलॅक्सेशन आणि मेडिटेशनने कार्यक्रमाची सांगता झाली.


