पुणे,21 ऑगस्ट 2025 : पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे 29 जुलै 2025 रोजी दाखल झालेल्या 61 वर्षीय मधुमेही महिलेला 9 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टरांनी केलेल्या जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी प्रक्रियेमुळे पायाचा भाग कापण्यापासून वाचवण्यात आले. ही शहरातील पहिली जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी प्रक्रिया आहे. बरा न होत असलेला पायाचा अल्सर (डायबेटिक फूट अल्सर) आणि कॅल्शियममुळे कडक झालेल्या पृष्ठभागावरील मुख्य धमनी (सुपरफिशियल फेमोरल आर्टरी – एसएफए) मुळे पायाला धोका निर्माण झाला होता. कमीत कमी छेद असणाऱ्या 45 मिनिटांच्या प्रक्रियेमुळे त्यांच्या पायातील रक्तस्त्राव पूर्ववत करण्यात यश मिळाले.
रूग्णालयात दाखल होताना या रूग्णाला वेदनादायक अल्सरचा त्रास होत होता,जो बरा होत नव्हता.पायातील पृष्ठभागातील मुख्य धमनी (एसएफए) मध्ये दगडासारख्या कडक झालेल्या कॅल्शियम साठ्यामुळे पूर्णपणे अडथळा निर्माण झाल्याचे तपासणीतून दिसून आले. या गोष्टीचे काळजीपूर्वक मुल्यांकन केल्यानंतर रूग्णालयातील वैद्यकीय पथकाने जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी प्रक्रिया निवडली. जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी या उपकरणामुळे कॅल्शियममुळे निर्माण झालेला अडथळा तोडता येणे शक्य होते. ही प्रक्रिया रूबी हॉल क्लिनिकमधील बाय – प्लेन कॅथलॅब येथे 9 ऑगस्ट रोजी करण्यात आली.त्यानंतर लगेचच रूग्णाला तात्काळ आराम मिळाला,त्यांच्या पायातील वेदना कमी झाल्या आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाला.यामुळे अल्सर बरा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि पाय कापण्याची (ॲम्प्युटेशन) ची गरज टळली.त्यांना 14 ऑगस्ट 2025 रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकचे चीफ इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ.यादव मुंडे म्हणाले की, हा कोणत्याही इतर सामान्य अडथळ्यासारखा नव्हता,कॅल्शियममुळे रक्तवाहिनी खूप कडक झाली होती.अशा परिस्थितीत सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या फक्त बलून किंवा स्टेंट ने धमनी खुली करता येणे कठिण होते.जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी उपकरणाच्या मदतीने आम्ही हे कडक झालेले साठे सुरक्षितपणे तोडण्यात,त्यांच्या पायात रक्ताभिसरण पूर्ववत करण्यात आणि त्यांचा पाय वाचवण्यात यशस्वी झालो.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की,मधुमेह रूग्णांमध्ये परिधीय धमनी रोग (पेरिफेरल आर्टरी डिसीज) ही अतिशय सामान्य समस्या आहे,मात्र अल्सर किंवा गँगरीन सारख्या गुंतागुंतीपर्यंत पोहचेस्तोवर त्याकडे दुर्लक्ष केले जाते.हे तंत्रज्ञान पुण्यासाठी एक मोठे यश आहे. यामुळे पूर्वी आव्हानात्मक वाटणाऱ्या समस्यांवर आता उपचार करणे आणि ॲम्प्युटेशन टाळणे शक्य झाले असून त्यामुळे रूग्णाचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल.
पेरिफेरल आर्टरी डिसीज (पीएडी) या स्थितीमध्ये पायाला पुरवठा करणाऱ्या धमन्या या कडक साठा जमा झाल्यामुळे अरूंद होतात.मधुमेहामुळे हे अडथळे अनेकदा जास्त कॅल्शियममुळे गुंतागुंतीचे होतात.यावर जर उपचार केले नाहीत तर गँगरीन होऊ शकतो किंवा पाय वाचविणे कठिण होते. जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमीच्या माध्यमातून या यशामुळे अशा आव्हानांना तोंड देणाऱ्या मधुमेही रूग्णांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.


