Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorized३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध ८ क्रीडा स्पर्धांचे आयोजन

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध ८ क्रीडा स्पर्धांचे आयोजन

३७वा पुणे फेस्टिव्हल दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत संपन्न होत असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसमवेत एकूण ८ क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक श्री. सुरेश कलमाडी यांनी देशात क्रीडा संस्कृती रुजवली. त्याचाच भाग म्हणून पुणे फेस्टिव्हल या सांस्कृतिक महोत्सवात ही त्यांनी क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले. यंदा गोल्फ कप टूर्नामेंट, मल्लखांब, बॉक्सिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बुद्धिबळ, स्केटिंग आणि डर्ट ट्रॅक अशा विविध ८ क्रीडा स्पर्धा संपन्न होणार असून, या सर्व स्पर्धांना प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हल क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व माजी नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.

 

 

 

पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता येरवडा येथील पूना क्लब गोल्फ कोर्स येथे पुणे फेस्टिव्हल गोल्फ टूर्नामेंट संपन्न होणार आहे. यामध्ये १०० हून अधिक नामवंत सहभागी झाले असून, अनेक कंपन्यांचे सीईओ व वरिष्ठ अधिकारी तसेच परदेशी पाहुणे सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा स्टेबलफोर्ड प्रकारातील हँडीकॅप डिव्हिजनमध्ये गोल्ड व सिल्व्हर गटामध्ये होणार आहे. यामध्ये बेस्ट लॉंगेस्ट ड्राइव्ह, स्ट्रेटेस्ट ड्राइव्ह आणि क्लोजेस्ट टू पिन विजेत्यांना विशेष पारितोषिकाने गौरवले जाणार आहे. याबरोबरच गोल्ड विभागात विजेत्याला पुणे फेस्टिव्हल रोलिंग ट्रॉफी दिली जाईल.

 

 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या सहकार्याने दिनांक ३० व ३१ ऑगस्ट या दोन दिवशी पुणे फेस्टिव्हल मल्लखांब स्पर्धा संपूर्ण दिवस पार पडतील. पुरलेल्या व दोरीवरच्या मल्लखांब प्रकारात होणाऱ्या या स्पर्धांमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थी मुले-मुलींनी भाग घेतला आहे. याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होईल. अभिजित भोसले व सचिन परदेशी हे याचे समन्वयक आहेत.

 

 

 

शनिवार, ३० ऑगस्ट रोजी मुकुंदनगर येथील झामरे पॅलेस येथे पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता उद्घाटन होईल. या स्पर्धेत २५० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून, ५ वयोगटांत (८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे व १५ वर्षांवरील खुला गट) असा गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेचे समन्वयक पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री. राजेंद्र कोंडे आहेत.

 

 

 

रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसभर पुण्याच्या भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये पुरुष व महिला गटात पुणे फेस्टिव्हल बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सहकार्य या स्पर्धेला लाभलेले आहे. या स्पर्धेत १४ वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील अशा दोन विभागात ८० मुले व ६० मुली सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत बेस्ट बॉक्सर, बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर, बेस्ट चॅलेंजिंग बॉक्सर ही विशेष बक्षिसे दिली जातील. या स्पर्धांचे समन्वयक मदन वाणी आणि विजय गुजर हे आहेत. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी याचे संयोजन केले आहे.

 

 

 

रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत ‘एल एक्स टी स्केट्स’, कासार साईगाव (हिंजवडी, मुळशी) येथे स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ५०० हून अधिक मुले-मुलींनी सहभाग घेतला आहे. ‘पुणे फेस्टिव्हल स्पीड स्केटिंग’ स्पर्धेचे समन्वयक म्हणून रितू राणे काम बघत आहेत.

 

 

 

रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम जवळील चोरडिया मैदानावर पुणे फेस्टिव्हल डर्ट ट्रॅक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध ११ गट असून, १५० हून अधिक मुले-मुली स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) ची मान्यता या स्पर्धेस लाभली आहे. ‘रोडीज अ‍ॅडव्हेंचर क्लब’चे अमरेंद्र साठे या स्पर्धेचे समन्वयक आहेत.

 

 

 

रविवार, ३१ ऑगस्ट रोजी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल येथे करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. रात्री ९.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. या स्पर्धेत केवळ मुलांचा समावेश असून, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो आणि ८० किलो व त्याहून अधिक असे एकूण ७ वजन गट असणार आहेत. या स्पर्धेत ८० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुणे जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे राजेंद्र नागरे हे या स्पर्धेचे समन्वयक आहेत.

 

 

 

शनिवार व रविवार, ३० व ३१ ऑगस्ट रोजी कैरम स्पर्धेचे हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ होईल. या स्पर्धेत एकूण ८ विभाग (गट) असतील आणि ती ओपन श्रेणी अंतर्गत घेतली जाणार आहे, त्यामुळे कोणताही स्पर्धक कोणत्याही गटात सहभागी होऊ शकतो. मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा असून १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी १५ ते १६ कैरम बोर्ड्स उपलब्ध असतील. रविवार ३१ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण संध्याकाळी ६ वाजता होईल. पुणे जिल्हा कैरम असोसिएशनचे वसंत वैराळ हे या स्पर्धेचे समन्वयक आहेत.

 

 

 

या सर्व स्पर्धा पाहण्यासाठी पुणेकरांनी आवर्जून यावे, असे आवाहन पुणे फेस्टिव्हलचे स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर प्रसन्न गोखले यांनी शेवटी केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments