Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे फेस्टिव्हल हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक माजी केंद्रीय गृहमंत्री...

पुणे फेस्टिव्हल हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे उद्गार ३७व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन डाॅ. कदम आणि डाॅ. इनामदार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

 

 

पुणे – पुणे फेस्टिव्हल हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. या महोत्सवाच्या व्यासपीठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रवाहांना सुरवातीपासून स्थान आहे, असे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे काढले. पुणे फेस्टिव्हलचे व्यासपीठ व्यापक करण्यात माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे योगदान आहे, असेही शिंदे म्हणाले.

 

पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणार्या ३७ व्या ‘पुणे फेस्टिव्हल’ चे दिमाखदार उद्घाटन शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे संपन्न झाले. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून रसिकांना साहित्य-कला-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभय छाजेड, डाॅ. सतीश देसाई, माजी मंत्री रमेश बागवे, उल्हास पवार आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.. तसेच अनेक परदेशी पाहुणे व परदेशी विद्यार्थी यांची उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थिती होती.

 

३७व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील व सुमा शिल्प हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, एनईसीसी, आयआयएफएल कॅपिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सुहाना मसाले आणि अहुरा बिल्डर्स हे उपप्रायोजक आहेत.

 

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, “मी केंद्रीय मंत्री तसेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी पुणे फेस्टिव्हलला उपस्थित राहिलो आहे. खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला हा फेस्टिव्हल, सातत्याने ३७ वर्षे चढत्या श्रेणीने उंची गाठत आहे. शून्यातून शैक्षणिक कर्तृत्व उभारणार्या शिक्षणतज्ञांचा आपण जीवनगौरव सन्मानाने गौरव केला आहे. पुणे फेस्टिव्हलचे व्यासपीठ सुरवातीपासून सर्वधर्मसमभावाची पूजा बांधणारे आहे, हे कलमाडी यांनी कामातून दाखवून दिले आहे. कधी कधी मोठ्या नेत्यांनाही पराभव स्वीकारावा लागतो, पण म्हणून या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही”.

 

माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुणे फेस्टिव्हल हा पक्षविरहित महोत्सव आहे आणि त्यामागे सुरेश कलमाडी यांचे कर्तृत्व आहे. पुण्याची संस्कृती जपणारा हा महोत्सव आहे. पुण्याची निवड ग्रोथ हब म्हणून झाली असली, तरी पुण्याचे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वारसासमृद्ध पुणेरीपण अबाधित ठेवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे”.

 

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे फेस्टिव्हल हा पुण्याचे भूषण आणि मानबिंदू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या महोत्सवात सहभागी होतात, हे महत्त्वाचे आहे”.

 

डाॅ. शिवाजीराव कदम म्हणाले, “पुण्यात मी प्रथम फार्मसी महाविद्यालय सुरू केले. शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले आणि गेली ४७ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे”.

 

डाॅ. पी. ए. इनामदार यांना देण्यात येणारा जीवनगौरव सन्मान, त्यांच्या पत्नी आबेदा इनामदार यांनी स्वीकारला. माझ्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल फेस्टिव्हलने घेतली, याविषयी इनामदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

खासदार श्रीरंग बारणे यांनीही पुणे फेस्टिव्हलमुळे जागतिक पर्यटन नकाशावर पुण्याचे नाव पोहोचल्याचा उल्लेख केला.

 

सुप्रिया बडवे प्रातिनिधिक मनोगत मांडताना म्हणाल्या, “पुणे फेस्टिव्हल अवार्ड, हे कौतुकाचे आहे, तसेच ते वाढलेल्या जबाबदारीचे भान देणारे आहे, याची जाणीव आहे. हा सन्मान वैयक्तिक नसून, संपूर्ण टीमचा आहे”.

 

कृष्णकुमार गोयल यांनी स्वागतपर प्रास्ताविकात पुणे फेस्टिव्हचा ३६ वर्षांचा आढावा घेतला. अभय छाजेड यांनी सुरेश कलमाडी यांचा संदेश वाचून दाखवला.

 

जीवनगौरव आणि फुणे फेस्टिव्हल अवार्ड

विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर, ज्येष्ठ नाटककार डॉ. सतीश आळेकर, क्रिकेटपटू केदार जाधव, ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ, माउली कृषी पर्यटन केंद्राचे ज्ञानदेव कामठे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळाचा पुणे फेस्टिव्हलमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा रास्ता पेठेतील नायडू गणपती मंडळाचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

नेत्रदीपक उद्घाटन सोहळा

पुणे फेस्टिव्हलच्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याची सुरवात ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईवादनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती संपन्न झाली. भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे गणेशवंदना सादर झाली. जानकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक संस्थेतर्फे ‘शिवतपस्वींचे नृत्य’ सादर झाले. भैरवी सचदेव यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. सिम्बायोसिस संस्थेच्या विदेशी विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्र मंडळाच्या युवा कसरतपटूंनी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके हे वेगळे आकर्षण ठरले. सिक्कीम भारतात विलीन झाला, त्यास यंदा ५० वर्षे झाल्यानिमित्त ऋतुरंग कल्चरल ग्रुप यांनी आयोजिलेले सिक्कीमचे ‘मरोनी’ लोकनृत्य व आसामचे ‘बिहू’ नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. पुण्यातील ईश्वरपुरम संस्थेत शिकणाऱ्या नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा ‘वॉर डान्स ऑफ नागालँड’ आणि ‘फेस्टिव्हल डान्स ऑफ अरुणाचल’ हे नृत्याविष्कार विनीत कुबेर यांच्या आयोजनात पेश झाले. ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे पुण्यातील केरळी कलावंतांचा राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ‘मिले सूर मेरा-तुम्हारा’ हा नृत्याविष्कार दाद मिळवणारा ठरला. आदिवासी संचालनालयाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे ‘तारपा’ हे आदिवासी लोकनृत्य सादर झाले. कथ्थक व लावणी यांची जुगलबंदी पायालवृंद डान्स अॅकॅडमीतर्फे सादर करण्यात आली. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले.

 

या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठीतून राजेश दामले व इंग्रजीतून सरिता मूलचंदानी यांनी केले. डा. सतीश देसाई यांनी आभार मानले.

—————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments