पुणे दि. 4 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार असून सहभागी होण्यासाठी गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल https : // mahadbt. maharashtra. gov. in / Farmer / AgriLogin / AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. विविध पिकांच्या पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
00000


