पुणे, ११ सप्टेंबर २०२५
कृषी व बांधकाम उपकरणांच्या क्षेत्रातील सीएनएच या जगप्रसिद्ध कंपनीने ऊस यांत्रिकीकरणाच्या यंत्रसामग्रीची भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी एकत्रित डिलिव्हरी पूर्ण केली आहे. कंपनीने लातूर (महाराष्ट्र) येथील देशमुख (मांजरा) समूहाला ११७ केस आयएच ऊसतोडणी यंत्रे व २३४ न्यू हॉलंड ट्रॅक्टर वितरीत केले. वितरणाचा हा सोहळा सीएनएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरिट मार्क्स यांच्या भारत भेटीदरम्यान पार पडला.
भारतामध्ये ऊसतोडणी यंत्रे आणणारी अग्रगण्य कंपनी म्हणून ‘सीएनएच’ने या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कामगार टंचाईचा प्रश्न सोडवणे, शेतीतील कार्यक्षमता वाढवणे आणि वेळेवर तोडणी सुनिश्चित करणे या सर्व बाबींसाठी ‘सीएनएच’च्या शाश्वत व उच्च कार्यक्षमतेच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
‘सीएनएच इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मित्तल म्हणाले, “या क्षेत्रातील अग्रणी या नात्याने भारतातील यांत्रिकीकरणाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी देशमुख समूहासोबत भागीदारी करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास हेच दाखवतो, की त्यांच्या गरजेनुसार त्यांना विश्वासार्ह, सक्षम आणि उच्च-कार्यक्षमता उपाय पुरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ऊस हा महाराष्ट्रासह भारतातील लाखो ग्रामीण कुटुंबांचा आधार आहे. उसाची तोडणी यांत्रिकी पद्धतीने स्वीकारून आपण या जीवनरेषेला अधिक सक्षम बनवू शकतो, उत्पादकता वाढवू शकतो, वेळेवर तोडणी सुनिश्चित करू शकतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतो.”
या प्रसंगी मांजरा समूहाचे संचालक धीरज विलासराव देशमुख म्हणाले, “आम्ही गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सीएनएचची उपकरणे वापरत आहोत. त्यांच्या यंत्रांची सातत्यपूर्ण गुणवत्ता, सुरक्षितता व विश्वासार्हता पाहता, आमचा पूर्ण विश्वास नेहमी ‘सीएनएच’वरच राहिला आहे. यंत्रसामग्रीचा विस्तार किंवा नूतनीकरणाचा विचार आम्ही जेव्हाही करतो, तेव्हा सीएनएच हाच आमचा पहिला पर्याय असतो. या नव्या डिलिव्हरीमुळे आमचे कामकाज अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व ऊस उद्योगासाठी अधिक मूल्यनिर्मिती घडेल, याची आम्हाला खात्री आहे.”
देशमुख (मांजरा) समूह हा प्रगत ऊस शेती पद्धतींसाठी ओळखला जाणारा अग्रगण्य कृषिउद्योग आहे. ‘सीएनएच’चा दीर्घकालीन ग्राहक असलेल्या या समूहाकडे भारतात १० साखर कारखाने आहेत आणि अगोदरपासूनची ४५ ऊसतोडणी यंत्रे व ९० ट्रॅक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे ‘सीएनएच’चा भारतातील सर्वात मोठा ग्राहक म्हणून देशमुख (मांजरा) समूहाची नोंद झाली आहे.
नवीन तंत्रज्ञानावर आधारलेली ही अत्याधुनिक तोडणी यंत्रे शेतातील कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढवतात. यांत्रिकीकरणामुळे ऊस शेतीत शाश्वत उपाय मिळतात, कार्यप्रवाह सुकर होतो, पिकाचे नुकसान कमी होते व कामगारांच्या कामाची स्थिती सुधारते. त्याचबरोबर कौशल्यविकासाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगारनिर्मितीही होते. प्रशिक्षित ऑपरेटरांची टंचाई दूर करण्यासाठी सीएनएच कंपनी साखर कारखान्यांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम चालवते. त्यातून पेरणीपासून कापणीनंतरच्या टप्प्यांपर्यंत ऊस शेतीचे शाश्वत चक्र पूर्ण करण्यात येते.
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सीएनएच इंडिया आपल्या ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांद्वारे जागतिक दर्जाची यंत्रसामग्री उपलब्ध करून देत आहे. ही कंपनी भारतात ‘केस आयएच’, ‘न्यू हॉलंड’ आणि ‘केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट’ या ब्रँड्सच्या माध्यमातून कार्यरत आहे. या ब्रॅंड्सना ‘सीएनएच कॅपिटल’ व ‘ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटर’ यांचा आधार आहे.


