पुणे, दि. १२ सप्टेंबर, २०२५ : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे रविवार दि. १४ सप्टेंबर पर्यंत सायं ५ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरु असणार असून तो रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
आज अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे राजदूत सुनील उपाध्ये, भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र, गायक व आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते महोत्सवाच्या १२ व्या वर्षाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक व किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण, द औंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वास्तुविशारद अभिजित सुभाष गायकवाड यांसोबतच गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे विश्वस्त समीर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
आज भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे आश्वासक गायक विराज जोशी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात झाली. विराज यांनी राग कौशी कानडाच्या प्रस्तुतीने गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित तालात ‘राजन के महाराजा…’ ही रचना पेश केली. ‘काहे करत मोसे बरजोरी…’ हा त्रितालातील ख्याल प्रस्तुतीने त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. ‘गजानन वरद विनायक हे…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. विराज यांना पांडूरंग पवार (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), रवी पांचाळ, प्रल्हाद शिंदे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी राग मियां की मल्हार मध्ये विलंबित आणि द्रुत एकतालचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबलासाथ केली. तर १२ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप रोंकिनी गुप्ता यांच्या सुमधुर गायनाने झाला. यावेळी रोंकिनी यांनी राग भीमपालासी आणि राग रागेश्रीचे सादरीकरण केले. राग भीमपालासी मध्ये त्यांनी ‘नैना मोरी पार…’ ही विलंबित तालातील बंदिश आणि ‘देखो बिजुरिया…’ ही द्रुत बंदिश प्रस्तुत केली. यानंतर राग रागेश्री मध्ये त्यांनी मध्यलयीमध्ये ‘छैल छबीला…’ तर द्रुत लयीमध्ये ‘जा जा रे पूरवैया…’ या बंदिशी गायल्या. ‘माझे माहेर पंढरी…’ या अजरामर अभंगाने त्यांनी सामारोप केला. कार्यक्रमाचे निवेदन आकाश थिटे यांनी केले.


