पुणे, २0 सप्टेंबर २०२५ : आधुनिक संकल्पना आणि पारंपरिकता यांचा अनोखा मिलाफ साधत विविध भारतीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजातील नागरिकांना एकत्र आणणार्या सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शारदीय दुर्गा पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपन्न होणार आहे. या महोत्सवाची या वर्षाची संकल्पना – “वारसा आणि सामंजस्याची सांगड” (हेरिटेज मीटस हार्मनी) ही आहे. या महोत्सवात बंगाली संस्कृतीतील प्राचीन परंपरांचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम पहावयास मिळणार असून त्यातून सामाजिक ऐक्य व देशाभिमान यांचे आगळे दर्शन घडणार आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू आणि विश्वस्त श्रेया भनोट यांनी दिली.
एकूण पाच दिवस चालणाऱ्या या दुर्गा पूजा महोत्सवात विविध रंगी भक्ती संगीत व नृत्य, कलाकारांचा नयन मनोहर अविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद, विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन, फूड कोर्ट आणि विविध संस्थांतर्फे अनेक प्रकारचे उपक्रम अशी खास आकर्षणे असणार आहेत. त्याचप्रमाणे सप्तपदी असोसिएशनच्या पर्यावरण जागरुकतेशी साधर्म्य सांगणारे अनेक विध सामाजिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित संकुल, व्हॅले पार्किंग, ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी व्हील चेअर सुविधा, 24 तास वैद्यकीय सहाय्यक यांची उपस्थिती यातून सप्तपदी असोसिएशनने हा दुर्गा पूजा महोत्सव सर्व सहभागी भाविकांसाठी कोणत्याही अडथळ्याविना व आनंददायक रित्या पार पाडेल अशी काळजी घेतली आहे. दररोज सकाळी विधीवत दुर्गा पुजा होणार असून त्यापाठोपाठ पुष्पांजली अन्य पारंपरिक पुजा विधी यांचा समावेश असणार आहे.
या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास म्हणाले की, दुर्गा पूजा महोत्सवातून केवळ भक्तिभावच नव्हे तर सामाजिक बंधुभाव व ऐक्य, आणि सांस्कृतिक परंपरा यांचे दर्शन घडते. या पाच दिवसीय अभिनव महोत्सवात दैनंदिन दुर्गा पूजा विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थांचा देखील आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवात रोजची सायंकाळ सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव असणार आहे.
सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू म्हणाले, इको फ्रेंडली दुर्गा मातेची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. अत्यंत कर्णमधुर अशा रबिंद्र संगीताचे सादरीकरण विख्यात कलाकारांद्वारे करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सर्व नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.पाच दिवस चालणारा हा महोत्सव सांस्कृतिक परंपरेचे जतन, एकात्मतेची भावना, भक्तिभाव आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव करणारा आहे . आम्ही यात सहभागी होणारे सदस्य, हितचिंतक व समाजातील लक्षावधी भाविक यांचे असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत.
सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या विश्वस्त श्रेया भनोट म्हणाल्या की, दरवर्षी हा महोत्सव अधिक अर्थपूर्ण व सर्व समावेशक व्हावा असा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला या महोत्सवाचा घटक असल्याची जाणीव व्हावी आणि पुरेपूर आनंद घेता यावा अशाच सुविधा आम्ही प्रदान केल्या आहेत.
सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जॉयदीप चॅटर्जी म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ एक भव्य दिव्य सांस्कृतिक महोत्सव साजरा करणे हे आमचे ध्येय नसून या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वतता, आरोग्य सेवा व सामाजिक विकासाकरिता कार्य करणाऱ्या विविध संघटनांना आम्ही साहाय्य करीत असतो. त्यामुळेच एक नेत्रदीपक महोत्सव साजरा करतानाच समाजाच्या ऋणाची परतफेड करण्याची संधी आम्हाला
मिळत असते


