*
पुणे : “पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट हा भारताचाच भाग आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे या भूभागाला मुकावे लागले. मात्र यापुढे देशाच्या विभाजनाचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी समितीचे वरिष्ठ सदस्य इंद्रेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. प्रसंगी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अली दारूवाला उपस्थित होते. संसदेवरील हल्ला लोकशाहीविरोधी, मानवताविरोधी असून, एकमेकांवरील विश्वास कायम राहण्यासाठी अशा घटना होऊ नयेत, असेही इंद्रेशकुमार म्हणाले.
भ्रष्टाचारी व्यक्तींना भाजप सोबत घेत आहे, त्यावर संघ भाजपला काय सल्ला देईल, असा प्रश्न विचारल्यावर इंद्रेशकुमार म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी या विषयाची चर्चा करता येणार नाही. जगभर सर्वत्र अध:पतन सुरु आहे. चारित्र्य घडवणारे शिक्षण देण्याची गरज आहे. त्यातूनच भ्रष्टाचार, गुन्हेगारी कमी होऊ शकेल.”
‘दो धागे श्रीराम के लिए’ कार्यक्रमात संघ परिवाराचा एक धागा, भारतीयांचा दुसरा, जगातील नागरिकांच्या वतीने तिसरा धागा मला विणता आला, याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनानंतर भारत देश जगाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आला. लॉकडाऊनची कल्पना भारताने जगाला दिली. भारतीय काढा तसेच लसीने मानवजातीचे रक्षण केले. भारताची प्रतिमा उंचावण्यात ‘जी-२०’ परिषद, युक्रेन युद्धातील भारताची भूमिका महत्वाची ठरली. दंगलमुक्त भारत, युद्धमुक्त विश्व व्हावे, अशी इच्छा असल्याचे इंद्रेशकुमार पुढे म्हणाले.
येत्या १२ जानेवारीला रामजन्मभूमीवर रामलल्ला विराजमान होत आहेत. त्यादिवशी देशात सर्व धर्मस्थळांवर तेथील रिवाजानुसार पूजा व्हावी. अयोध्येवरून येणारा प्रसाद सर्व गावातील धार्मिक स्थळांवर पोहोचविला जाणार आहे. सर्व शहरे, गावात प्रकाशोत्सव साजरा व्हावा, २७ जानेवारीपर्यंत अयोध्यावारी आयोजित केली जाणार आहे. संघ परिवार ताकदीनिशी हे सर्व कार्यक्रम यशस्वी करेल, अशी माहितीही इंद्रेशकुमार यांनी दिली.
काँग्रेसच्या काळात अनेकदा घटना दुरुस्ती झाली. अटलजींच्या, मोदींच्या काळात घटनादुरुस्ती झाली नाही, त्यामुळे संघ परिवार संविधान विरोधी आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे. सामाजिक अन्याय जाईपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे. आर्थिक मुद्यावर आरक्षण दिल्यावर सामाजिक अन्याय लवकर दूर होईल, असे आमचे मत असल्याचे इंद्रेशकुमार यांनी स्पष्ट केले.


