Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedइनक्लॅम‌’ तर्फे संगीत प्रेमींसाठी ‌‘शब्दांपलिकडच्या सुरांची साद‌’ हा विशेष उपक्रम ‌‘बीएनसीए‌’मध्ये...

इनक्लॅम‌’ तर्फे संगीत प्रेमींसाठी ‌‘शब्दांपलिकडच्या सुरांची साद‌’ हा विशेष उपक्रम ‌‘बीएनसीए‌’मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील 67 रागांचा आधारित लोकार्पण सोहळा

पुणे, दि. 24 : शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या इंडियन क्लासिकल म्यूझिक उर्फ ‌‘इनक्लॅम‌’ या यूट्यूब चॅनल तर्फे ‌‘शब्दांपलिकडच्या सुरांची साद‌’ हा 67 अनिबद्ध स्वरूपातील रागांचा लोकार्पण सोहळा रविवारी 28 सप्टेंबर रोजी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) सभागृहात आयोजित केला आहे. हे लोकापर्ण संगीताचार्य डॉ. विकास कशाळकर, पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे आणि बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

 

हे सर्व राग अनिबद्ध म्हणजे शब्द, ताल व साथसंगतीशिवाय केवळ कंठसंगीतातील स्वरांमधून जगभरातील भारतीय शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे ‌‘इनक्लॅम‌’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र करंबेळकर व सृजनात्मक संचालक राजीव तांबे आणि अंकिता तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले की, विशेषत: तरुण पिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लागावी यासाठी या 67 रागांचे खास तयार करण्यात आलेले दृक-श्राव्य स्वरूपातील मुद्रण पुढील पिढ्यांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले जाईल. त्याची झलक म्हणून निवडक 12 रागांचे सादरीकरण प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर आणि श्रुती देशपांडे यावेळी करणार आहेत.

 

‌‘इनक्लॅम‌’ने तयार केलेल्या या रेकॉर्डिंंगमधील 67 रागांचे शुद्ध गायनात 29 गायकांनी केले असून त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक महेश काळे, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर आणि जयतीर्थ मेवूंडी यांचाही समावेश आहे; तर या 67 रागांमध्ये भटीयार, कापर गौरी भैरव, कामोद, बिहाग, नंद, मारूबिहाग इत्यादी गायले आहेत.

 

यासंबंधी बोलताना डॉ. करंबेळकर म्हणाले की, हे सर्व पारंपरिक राग जेव्हा निर्माण झाले तेव्हा ते अनिबद्ध म्हणजे खयाल व बंदिशी सोडून आणि तालवाद्यांशिवाय सादर केले जात असावेत. त्यातून त्या त्या रागांमधील स्वरांचा थेट आस्वाद घेताना ते अल्हाददायक वाटत असे. यातून भारतीय शास्त्रीय संगीताची आदिम भाषा अबाधित ठेवणे शक्य होत असे. तोच आधार घेत आम्ही हे सर्व राग साथसंगीत व शब्दांशिवाय मूळ स्वरांच्या सुगम भाषेतच खास करून ध्वनीमुद्रीत केले आहेत. यातून शास्त्रीय संगीताबाबतचे प्रेम व त्यातील गोडी तरुण पिढीस लागेल व भारतीय शास्त्रीय संगीतासंबंधी ते बोजड, अवघड असते, असे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. तसेच त्यातील निर्भेळ आनंद सर्वांनाच घेता येईल.

 

संवादिनी वादक राजीव तांबे म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीतात वाद्यांपेक्षा कंठ संगीत हे परिपूर्ण समजले जात असून त्यासाठी भाषेचे वा शब्दांचे बंधन पाळावे लागत नाही. किंबहुना त्या त्या रागातील केवळ स्वरबद्ध संगीत हे ऐकणारा श्रोता आवडीने त्या सूरात सूर मिसळून गाऊ शकतो, गुणगुणू शकतो व त्याचा अजोड आनंद घेऊ शकतो. त्या अर्थाने भारतीय शास्त्रीय संगीताची भाषा ही शब्दांशिवाय जगातील सर्व भाषा, प्रांत, धर्म व जातींना जोडणारी असल्यामुळेच आम्ही या उपक्रमाला ‌‘शब्दांपलिकडच्या सुरांची साद‌’ असे नाव दिले आहे.

 

या संबंधी बोलताना गायिका अंकिता तांबे म्हणाल्या की, हे राग कुठेही कधीही ऐकताना त्यातील सांगितीक आनंदाशी श्रोता स्वत:च्या भावविश्वाशी जोडून घेऊ शकतो. त्यातून मनोरंजनापेक्षाही मन:शांती, तसेच आनंद व समाधानाची अनुभूती ऐकणाऱ्या प्रत्येकाला घेता येते . या शुद्ध कंठसंगीतामुळे भारतीय शास्त्रीय संगीतासंबंधीची अढी, भीती व न्यूनगंड दूर व्हायला निश्चित मदत होईल. आजच्या धावपळीच्या जगात हे शुद्ध शास्त्रीय संगीत शांतपणे ऐकणे हा एक चित्तवृत्ती प्रसन्न बनवणारा अनुभव ठरेल.

 

प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी पूर्वीच म्हटले आहे की, या गायनात हे सूर त्या रागातील सुरांना कुठे घेऊन जाऊ शकतो, यापेक्षा ते सूर त्या गायकाला कुठे घेऊन जातात हे महत्त्वाचे आहे! जयतीर्थ मेवूंडी म्हणतात त्यानुसार, या संगीतातली अभिजातता ही जनसामान्यांपर्यंत जाण्याची क्षमता या सुरांमध्ये मध्ये आहे. ज्येष्ठ गायिका व विदुषी पंडिता किशोरी अमोणकर यांनाही त्यांच्या ‌‘स्वप्नातील एक मैफील‌’ इतर कोणत्याही साथसंगतीशिवाय फक्त तंबोऱ्यासह सादर करायची इच्छा होती, असा लिखित उल्लेख करण्यात आला आहे.

 

डॉ. करंबेळकरांनी म्हणाले की, काळाच्या पडद्याआड गेलेल्या व प्रचलित न राहिलेल्या काही दुर्मिळ रागांचे मूळ शुद्ध स्वरूपात दस्तावेजीकरणाचा अनोखा प्रकल्पही आम्ही लवकरच हाती घेणार आहोत.

 

कार्यक्रमाचा तपशील:

दिनांक : 28 सप्टेंबर 2025

वेळ : सकाळी 10.30 ते दुपारी 12.30

स्थळ : ‌‘बीएनसीए‌’चे सभागृह, चौथा मजला, कर्वेनगर, पुणे

 

आधिक माहितीसाठी संपर्क :

डॉ. राजेंद्र करंबेळकर :

संस्थापक अध्यक्ष ‌‘इनक्लॅम‌’

9890428837

rjkarambelkar@yahoo.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments