पिंपरी, ८ ऑक्टोबर २०२५ : कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला मिळालेली रसिकांची दाद आणि संवादांच्या ओघात अनुभवलेली भावनांची खोली… अशा अप्रतिम वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त सादर झालेले ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘पत्रा पत्री’ हे दोन नाट्यप्रयोग हाऊस फुल प्रतिसादात रंगले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या महोत्सवात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पु. ल. देशपांडे लिखित अजरामर मराठी नाटक ‘तुझे आहे तुजपाशी‘ आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे प्रस्तुत नाट्याभिनय ‘पत्रा पत्री’ या सादरीकरणांना प्रेक्षकांकडून मिळालेली उत्स्फुर्त दाद आणि नाट्यगृहात झालेली हाऊस फुल गर्दी अशा अभूतपूर्व प्रतिसादाने कार्यक्रमांची रंगत वाढली.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह नाट्यरसिकांची उपस्थिती या कार्यक्रमांना होती.
डॉ. गिरीश ओक, सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉ. प्रचीती सुरू आणि रुपाली पात्रे या कलाकारांनी सादर केलेले ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक रसिकांसाठी भावनांचा अविस्मरणीय प्रवास ठरला. आधुनिक नातेसंबंधांतील गुंतागुंत, मनातील संभ्रम, प्रेमाची ओढ आणि आत्मभानाचा शोध या विषयांना स्पर्श करणारे हे नाटक संवादांच्या ताकदीने भारलेले होते. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने प्रत्येक प्रसंग जिवंत झाला. नाटकातील संवादांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली, तर शेवटच्या अंकानंतर उभे राहून दिलेली दाद या नाट्यप्रयोगाच्या यशाची साक्ष देत होती. सादरीकरणातील सहजता, संवादांची ओघवती लय आणि पार्श्वसंगीताचा भावनिक स्पर्श यांनी नाटक अधिक उठावदार केले. या नाट्यप्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संवेदनशीलतेचा आणि कलात्मक परिपक्वतेचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला. ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’तील हा प्रयोग प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
‘पत्रा पत्री’ नाट्याभिनय हा सादरीकरणाचा वेगळा प्रयोग ठरला. पत्रांच्या माध्यमातून उलगडणारे जीवन, नात्यांतील भावनांची ओल आणि शब्दांमधील मूक वेदना यांचा सुंदर मिलाफ या प्रयोगात दिसून आला. पारंपरिक रंगमंचापेक्षा वेगळ्या संकल्पनेतून सादर झालेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना शब्दांच्या नाट्याचा आगळावेगळा अनुभव दिला. सामाजिक जाण, मानवी मूल्ये आणि संवादांच्या माध्यमातून नात्यांचा प्रवास या सर्वांचे चित्रण या प्रयोगात प्रभावीपणे मांडले गेले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहात सादर झालेल्या या दोन्ही प्रयोगांच्या वेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली होती. प्रत्येक प्रसंगानंतर दुमदुमणाऱ्या टाळ्यांचा गजर आणि कलाकारांना मिळणारी उत्स्फूर्त दाद यामुळे प्रेक्षागृहात उत्सवमय वातावरण निर्माण झाले.
……