कावासाकी, जपान – जागतिक वीज मागणी वाढल्याने तोशिबा एनर्जी सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कॉर्पोरेशनने (तोशिबा) वीज वहन आणि वितरण (टी अँड डी) उपकरण व्यवसायात गुंतवणुकीचा महत्त्वपूर्ण विस्तार करण्याची आज घोषणा केली. कंपनी आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत एकंदर ५५ अब्ज येनची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीमुळे आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०३० पर्यंत जपान आणि भारतातील तोशिबाच्या प्रमुख सुविधांमधील एकत्रित उत्पादन क्षमता दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
हा उपक्रम जुलै २०२४ मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२०२६ साठी जाहीर केलेल्या २० अब्ज येन गुंतवणुकीवर आधारित आहे. मागणी आता सुरुवातीच्या अंदाजांपेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्यानं, तोशिबानं जपानमधील कावासाकी इथल्या हामाकावासाकी ऑपरेशन्स आणि भारतातील हैदराबाद इथल्या तोशिबा ट्रांसमिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे “TTDI” म्हणून उल्लेखित) यामध्ये अतिरिक्त ३५ अब्ज येन गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्तारित गुंतवणुकीमागील तर्क स्पष्ट करताना, तोशिबाच्या ग्रिडसोल्यूशन विभागाचे उपाध्यक्ष हिरोशी कानेता म्हणाले: “जगभरात वीज मागणी वाढत असताना, T&D उपकरणांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जपानमध्ये, T&D उपकरणांची मागणी २०३० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती जास्त राहणार असून, जुन्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण, अक्षय ऊर्जेचा विस्तार आणि नवीन डेटा सेंटर्सच्या बांधकामामुळे ती प्रेरित आहे. भारतात, आर्थिक आणि शहरी लोकसंख्या वाढ आणि अक्षय ऊर्जेचा वेगवान अवलंब यामुळे वीज मागणी वेगाने वाढत आहे.”
उच्च-व्होल्टेज T&D उपकरणांचा एक आघाडीचा पुरवठादार म्हणून, तोशिबा हामाकावासाकी ऑपरेशन्स आणि TTDI इथे विद्यमान उत्पादन लाईन्सचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण, नवीन बांधकाम आणि कारखाना पायाभूत सुविधा अपग्रेड करून आपल्या उत्पादन क्षमता भक्कम करण्यासाठी गुंतवणूक करेल. या सामायिक उपक्रमांव्यतिरिक्त, प्रत्येक ठिकाणी विशिष्ट गरजांनुसार उपाययोजना राबवल्या जातील. हामाकावासाकी ऑपरेशन्समध्ये, तोशिबा कामकाजाचे वातावरण सुधारण्यासाठी जुन्या कर्मचारी कल्याण सुविधांचे नूतनीकरण करेल, यामध्ये आपल्या संचालनात्मक उत्कृष्टतेच्या योजनेचं प्रतिबिंब असेल. TTDI मध्ये, कंपनी जागतिक बाजारपेठेतील वाटा वाढवण्याच्या उद्देशानं भारतीय बाजारपेठ आणि उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व यासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना चांगली सेवा देण्यासाठी त्यांच्या उत्पादन श्रेणींचा विस्तार करेल.
वीज प्रकल्पांमधून ग्राहकांना वीज पोहोचवण्यासाठी T&D उपकरणे आवश्यक आहेत आणि स्थिर वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावतात. स्विचगियर, ट्रान्सफॉर्मर, सर्ज अरेस्टर आणि इतर T&D उपकरणे तयार करण्याच्या १०० वर्षांहून अधिक अनुभवासह, तोशिबाने विश्वासार्हतेसाठी जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे.
याखेरीज, तोशिबा स्थिर वीज पुरवठ्यासाठी आधारभूत भक्कम पॉवर ग्रिड तयार करण्याकरिता आपल्या तांत्रिक कौशल्यं आणि विश्वासार्ह कामगिरीचा वापर करेल. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणीला सहज आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी आपल्या उत्पादन प्रणाली बळकट करेल, कार्बन न्यूट्रॅलिटीला समर्थन देणाऱ्या तंत्रज्ञानासह पुढील पिढीतील तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकास प्रगत करेल आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी आराम यामध्ये वृद्धि करत राहील. या प्रयत्नांद्वारे, तोशिबाचे उद्दिष्ट आपल्या व्यावसायिक स्पर्धात्मकतेला बळकटी, ग्राहकांसाठी अधिक मूल्य आणि अधिक शाश्वत ऊर्जा भविष्याकडे संक्रमणाकरिता पाठिंबा
देण्याचे आहे.


