आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळी निमित्त नुकताच सानपाड्यातील सीताराम मास्टर उद्यानातील सकाळच्या
तिन्ही हास्य मंडळाचे सदस्य आणि नागरिकांसोबत दिलखुलास संवाद साधला.
मंदाताईंनी सुरुवातीस सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन, मार्गदर्शन करताना सांगितले की, बेलापूर मतदार संघात नेहमी कायदा व सुव्यवस्था नांदत असते,ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आपल्याला कोणत्याही समस्या असतील तर मला प्रत्यक्ष येऊन भेटा, त्या ताबडतोब सोडविल्या जातील. सरकारदरबारी केवळ पत्र देऊन प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो,असे अधोरेखित करून त्यांनी सानपाड्यामधील पाण्याचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा कालावधी पाच वर्ष करणे या महत्त्वपूर्ण मागण्या ताबडतोब सोडविल्या जातील, अशी ग्वाही त्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दिली.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त चिखली हे गाव आपण दत्तक घेतले असून, या गावातील ३०० पूरग्रस्तांना सहा लाख रुपयाचे अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक साहित्य दिले आहे. सानपाड्यातील सर्वांनी एकत्रित प्रभात फेरी काढून थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे जी काय रक्कम जमेल ती आपण पूरग्रस्तांना देऊ. त्यामुळे सानपाड्यातून एक चांगला संदेश जाईल, असेही
आवाहन त्यांनी केले.
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याच्या आणि काम करणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.
या संवादात महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,
माजी नगरसेवक सोमनाथ वासकर,नवी मुंबई शिवसेनेचे ( उबाठा ) उपशहरप्रमुख अजय पवार, भाजपचे नवी मुंबई शहर अध्यक्ष पांडुरंग आमले, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम,उपाध्यक्ष
श्री विठ्ठल गव्हाणे, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी आदींनी
भाग घेतला.श्री आबा जगताप यांनी आभार मानले.
या संवादानंतर सर्व उपस्थितांना मंदाताईंतर्फे दिवाळीची मिठाई देण्यात आली.


