पुणे : माता कौसल्या, सुमित्रा, राजमाता जिजाबाई ही परंपरा चालविणाऱ्या माता व पत्नी आजही समाजात आहेत. देशासाठी सैनिकांना जरी वीरगती प्राप्त झाली, तरी देखील कुटुंबाचा सांभाळ करणारी वीरपत्नी आणि माता असते. त्यामुळेच देशासाठी स्वत:च्या आयुष्याचे फूल वाहून पूजा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नी खऱ्या अर्थाने देशस्वामिनी आहेत, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार, सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब मिडटाऊन, नारद मंदिर आणि सहयोगी संस्थांच्या वतीने शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींची रौप्यमहोत्सवी भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, रोटरी क्लबचे डॉ. चंद्रशेखर वळवणकर, आचार्य शाहीर हेमंत मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन होले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मंदार रांजेकर, गिरीश पोटफोडे, पराग गुजराती, शेखर कोरडे,अमर लांडे, उमेश देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, वीरमाता आणि वीरपत्नी यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचा त्याग अवर्णनीय आहे. सण उत्सवाच्या काळात अनेक भावनाशील संस्था या घटकांची ओळख समाजाला करून देतात. त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी.
आनंद सराफ म्हणाले, सन २००१ सालापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला. बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व माता यांच्यासाठी वानवडी येथे वीरस्मृती ही वसाहत आहे. आज याच वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबाच्या त्यागामुळेच तिरंगा आकाशात फडकत आहे, असेही त्यांनी सांगितले. पराग ठाकूर यांनी स्वागत केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.


