पुणे, 27ऑक्टोबर 2025: पुण्यातील नामवंत गोल्फ क्लब पुना क्लब लिमिटेड आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया(पीजीटीआय) यांच्या वतीने संयुक्तपणे पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेच्या सलग दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर 28 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान रंगणार असून या स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला यजमान पुना क्लब गोल्फ कोर्स यांच्यासह व्हॅनकॉब आणि एनईसीसी यांचे मुख्य प्रायोजक लाभले आहे. या मुख्य प्रायोजकांबरोबरच व्हेंटिव्ह, एसकेएस फास्टनर्स, एलिका, मार्व्हेल रिअल्टर्स, शुबान इन्व्हेस्टमेंटस, डीएफएमसी, ऑटोमेक अँड कायनेटिक, नोव्होटेल पुणे नगर रोड यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे.
या स्पर्धेत भारतीय दिग्गज खेळाडूंमध्ये डीपी वर्ल्ड टूर मधील वीर अहलावत, पीजीटीआय मानांकन यादीतील अव्वल खेळाडू युवराज संधू, अर्जुन प्रसाद, अंगद चिमा, शौर्य भट्टाचार्य, ओम प्रकाश चौहान व मनू गंडास यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील परदेशी खेळाडूंचे आव्हान श्रीलंकेचा एन एन थंगराजा व नेपाळचा सुभाष तमांग हे खेळाडू सांभाळणार आहेत.
यजमान पुना क्लब गोल्फ कोर्सचे प्रतिनिधित्व रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर, पीजीटीआय विजेता गुर्कि शेरगिल, अक्षय दामले, प्रवीण पठारे, एरोन रॉकी, आदित्य भांडारकर, समीर शेख, राजीव दातार, जयदीप पटवर्धन, सुनील गालफाडे हे व्यावसायिक खेळाडू करणार आहेत. ही स्पर्धा 72-होल-स्ट्रोक-प्ले धर्तीची असून या स्पर्धेत 123 व्यावसायिक व 3 हौशी अशा एकूण 126 खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. पहिल्या 36 होल नंतर स्पर्धेचे पहिले सत्र संपणार असून त्यावेळी अव्वल 50क्रमांकावर असलेले खेळाडू पुढचे 36 होलचे दुसरे सत्र खेळणार आहेत.
पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक यावेळी म्हणाले की, पुना क्लब ओपन स्पर्धेच्या गेल्यावर्षी झालेल्या पहिल्या सत्रातील अभूतपूर्व यशानंतर क्लबचे सभासद व गोल्फ प्रेमी दुसऱ्या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते. पीजीटीआयच्या संयुक्त सहभागातून होणाऱ्या या स्पर्धेमुळे देशभरातील अव्वल व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून त्यामुळे या स्पर्धेचा सर्वोत्तम दर्जा निश्चित झाला आहे. त्यामुळेच आमच्या खेळाडूंना देशभरातील सर्वोच्च दर्जाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच, स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणामुळे पुण्यातीलच नव्हे तर देशभरातील गोल्फ प्रेमींना, परदेशातील प्रेक्षकांनाही या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. या स्पर्धेमुळे पुना क्लब हा देशातील सर्वोत्तम क्लब असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सहभागी सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देऊ इच्छितो.
पुना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले म्हणाले की, पूना क्लब ओपन ही स्पर्धा पीजीटीआय कार्यक्रम पत्रिकेतील सर्वाधिक प्रतीक्षेची स्पर्धा बनली आहे. या स्पर्धेमुळे केवळ सर्वोत्तम दर्जाच सिद्ध होणार नसून आमच्या क्लबची सर्वोत्तम खिलाडूवृत्तीही सिद्ध होणार आहे. या स्पर्धेच्या 2025च्या सत्रामुळे देशातील व्यावसायिक स्पर्धांचा दर्जा उंचावणार असून पुना क्लबचे भारतीय गोल्फ क्षेत्रातील असलेले योगदान दिसून येणार आहे.
पुना क्लबच्या लेडी कॅप्टन पद्मजा शिर्के म्हणाल्या की, पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेच्या आयोजनामुळे पुना क्लबच्या सन्मानात आणखी भर पडली आहे. या स्पर्धेमुळे सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या अनुभवाचा आणि दर्जाचा स्पर्धात्मकता उंचावण्यासाठी फायदा होणार असून हे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
पुना क्लब गोल्फ कोर्सचे माजी कॅप्टन व सल्लागार इक्रम खान म्हणाले की, पुना क्लबच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेमुळे आमच्या युवा खेळाडूंना मोठी संधी लाभणार असून यातून मिळणाऱ्या प्रेरणेच्या जोरावर आमचे खेळाडू लवकरच पीजीटीआय टूर स्पर्धेत विजेतेपद मिळवू लागतील. युवा खेळाडूंवर सर्वाधिक मेहनत करणारा आमचा असा हा क्लब आहे.
पीजीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमनदीप जोहल म्हणाले की, जागतिक गोल्फ मानांकन तसेच, ऑलिंपिक पात्रता गुणांचा दर्जा लाभलेल्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला मान्यता देताना आणि त्या स्पर्धेसाठी भागीदारी करताना पीजीटीआयला आनंद होत आहे. या व्यावसायिक गोल्फ क्षेत्राला सातत्याने पाठिंबा देण्यासाठी सज्ज असताना ही संधी दिल्याबद्दल आम्ही पुना क्लबचे आभारी आहोत. पुना क्लब गोल्फ ओपन स्पर्धेच्या यशामुळे भारतीय गोल्फपटूंच्या नव्या पिढीला जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. पुना क्लबच्या भागीदारीत यानंतर ही स्पर्धा अधिक भव्य रीतीने आयोजित करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. रोलेक्स, अमूल, इंडसइंड बँक, व्हिक्टोरियस चॉईस, कॅम्पा, अमृतांजन इलेक्ट्रो प्लस यांनी या स्पर्धेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभा
र मानतो.


