Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप

दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप

उस्ताद अक्रम खान व पं. अरविंद कुमार आझाद यांचे तबला सहवादन, विवेक राजगोपालन यांच्या ‘ता धोम…’ चे सादरीकरण आणि पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांचे सतारवादन यांनी गाठली उंची

 

पुणे, दि. २ नोव्हेंबर, २०२५ : दोन दिवस युवा आश्वासक कलाकारांच्या सादरीकरणानंतर १३ व्या तालचक्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने महोत्सवाने एक वेगळीच उंची गाठली. १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. यावेळी अजराडा घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अक्रम खान आणि पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांचे तबला सहवादन, विवेक राजगोपालन यांच्या ‘ता धोम…’ चे सादरीकरण आणि पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांचे सतारवादन यांमुळे पुणेकर रसिक स्वर आनंदात जणू न्हाऊन निघाले.

 

तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेल्या तालचक्र महोत्सवाचे आयोजन सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावर्षी महोत्सवास पुनीत बालन समूहाचे विशेष सहकार्य लाभले असून तालचक्र महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. आज तिसऱ्या व शेवटच्या दिवसाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत झाली. यावेळी पं. विजय घाटे, ममता घाटे, प्रसिद्ध व्हायोलिन वादक, गुरु पं अतुलकुमार उपाध्ये, व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये, अंकिता तिडके, भरत कुळहळ्ळी, जयदेव बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उस्ताद अक्रम खान आणि पं. अरविंद कुमार आझाद यांनी अनुक्रमे अजराडा आणि बनारस घराण्याचे पारंपारिक तबला वादन प्रस्तुत केले. यानंतर पेशकार, कायदा, रेला, घराण्याच्या पारंपारिक बंदिशी आणि गत यांची त्यांनी बहारदार प्रस्तुती केली. अजराडा आणि बनारस घराण्याचे वादन यानिमित्ताने उपस्थितांनी अनुभवले. यावेळी दिलशाद खान यांनी सारंगी तर यशवंत थिट्टे यांनी संवादिनी साथ केली.

 

यानंतर विवेक राजगोपालन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ता धोम…’ या म्युझिक प्रोजेक्टचे सादरीकरण झाले. ‘ता धोम’ हा प्रकल्प केवळ एक सांगीतिक सादरीकरण नसून भारतीय शास्त्रीय तालवाद्य आणि स्ट्रीट रॅप यांना एकत्र बांधणारा दुवा आहे, संगीताच्या सर्व भिंती ओलांडत विविध बोलीभाषांना उंचावणारा प्रकल्प आहे. याद्वारे शास्त्रीय व हिप हॉप अशा दोन संस्कृती सहभावनेने एकत्र येतात असे राजगोपालन म्हणाले. गुरु टी. एस. नंदकुमार यांच्या कर्नाटक परंपरेत तयार झालेले विवेक राजगोपालन मृदंगम हे वाद्य तयारीने वाजवतात. नादाच्या जिज्ञासेने त्यांनी मिडीदंगम हे वाद्यही तयार केले आहे. हे वाद्य मृदंगम च्या तत्त्वावर आधारित आहे. यावेळी विवेक राजगोपालन आणि समूहाने ‘देअर इज नो बोर्डर…’, ‘से इट विथ मी…’, बोल्ड रॅप, , के रॅप, या रचना सादर केल्या.

 

यावेळी स्वत: राजगोपालन हे मृदंगमवर तर आकाश पांडे, गणेश सोनकांबळे, कलईवनन कन्नन हे रॅपर म्हणून सहभागी झाले होते. यावेळी सायरा मित्रा (बेस गिटार), यामिनी खामकर-वाघरे व स्वरांगी सावदेकर (ढोल), वरूण पाटील (साउंड) यांनी साथसंगत केली.

 

१३ व्या तालचक्र महोत्सावाचा समारोप उस्ताद शाहीद परवेज यांचे सतारवादन व पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या तबलावादनाने झाला. त्यांना आदित्य देशपांडे यांनी तानपुरा साथ केली. या दोघांनी यावेळी राग चारुकेशी आणि पहाडी अंगाने राग मिश्र खमाज सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

 

यावर्षीच्या तालचक्र महोत्सवासाठी पुनीत बालन समूहा सोबत बढेकर समूह, वेनकॉब, एनईसीसी, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी, बरवा स्किन थेरपी, फिब्रो इंडिया, वेंकीज, मस्कॉट आणि गिरिकंद हॉलिडेज यांचे सहकार्य

लाभले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments