मुंबई, ६ नोव्हेंबर २०२५ : कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (केएमएएमसी) गुंतवणूकदारांसाठी कोटक रुरल अपॉर्च्युनिटीज फंड ही नवीन फंड योजना आणत असल्याची घोषणा केली आहे. मुदतमुक्त स्वरुपातील ही इक्विटी योजना प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच संबंधित संकल्पनावर आधारलेली आहे. सदर योजना गुंतवणूकदारांसाठी ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक गुंतवणूकीसाठी खुली राहणार आहे.
भारतातील ग्रामीण परिवर्तनाशी संबंधित असलेल्या अथवा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाचा फायदा मिळणाऱ्या कंपन्यांचे समभाग आणि समभागाशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. अशा गुंतवणूकीतून दीर्घकालीन भांडवल वृध्दीची निर्मिती, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. या फंड योजनेसाठी निफ्टी रुरल इंडेक्स (TRI) हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे.
फंड योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह म्हणाले, “ग्रामीण भारत आता फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भारताच्या विकासासाठी खुले झालेले एक नवे दालन आहे. आर्थिक समावेशापासून ते डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि अगदी स्थानिक उत्पादनापर्यंत अशा नानाविध बाबींमुळे ग्रामीण भारत संधी, आकांक्षा आणि धोरणांनी प्रेरित अशा परिवर्तनाचा एक नवीन पैलू ठरला आहे. ग्रामीण भागातील वाढते उत्पन्न आणि ग्राहकपयोगी वस्तूंचा वाढता उपभोग आता भारताच्या ढोबळ अर्थप्रणालीचे अविभाज्य अंग बनले आहे. गुंतवणूकदारांना विकासाच्या या परिवर्तनात सहभागी होण्यास मदत करणे, हा कोटक रुरल अपॉर्च्युनिटीज फंडाचा उद्देश आहे आणि हा उद्देश भारताच्या सर्वसमावेशक आणि संतुलित आर्थिक विकासाच्या प्रवासाशी अतिशय मिळताजुळता आहे.”
ग्रामीण भारत हा आता केवळ शेतीपुरता मर्यादीत राहिलेला नसून शेतीच्या पलीकडे झपाट्याने विकसित होत चालला आहे. ग्रामीण भागातील सुमारे ४० टक्के कामगार आता बिगर-कृषी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. कामगार संख्येमध्ये २०१८ पासून महिलांचा सहभाग जवळजवळ दुप्पट झाला आहे. त्यामुळे दुहेरी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक खर्च आता बिगर-अन्न वस्तूंवर होत आहे. उत्पन्न, आकांक्षा आणि वस्तूंचा उपभोग या गतिमान केंद्रांकडे ग्रामीण भाग झपाट्याने वाटचाल करत असल्याचे यातून दिसून येते. (स्रोत: पीएलएफएस, नाबार्ड, मॉर्गन स्टॅनली).
ग्रामीण क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातूनच या फंडाचा पोर्टफोलिओ साकारला जाणार आहे. पोर्टफोलिओची गुणवत्ता राखण्यासाठी त्याचबरोबर वाढीची क्षमता सदैव राखण्याकरिता समभाग निवडताना कठोर निकषांचा अवलंब केला जाणार आहे. परिणामी, दर्जेदार समभागांचा एक वैविध्यपूर्ण संच तयार होईल. या समभागांचे नियमित पुनरावलोकन केले जाईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत वेळोवेळी तयार होणाऱ्या संधी हेरण्यासाठी पोर्टफोलिओत सातत्याने संतुलन केले जाणार आहे.
कोटक रुरल अपॉर्च्युनिटीज फंड योजनेचे फंड व्यवस्थापक अर्जुन खन्ना म्हणाले, “ग्रामीण अर्थव्यवस्था या संकल्पेबाबत आमचा दृष्टिकोन अतिशय संरचनात्मक आणि सकारात्मक आहे. उत्पन्नात होत चाललेली सुधारणा, उत्तमोत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती आणि वित्त तसेच तंत्रज्ञानाची वाढती उपलब्धता हे शाश्वत त्याचबरोबर व्यापक विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहेत. आज ग्रामीण अर्थव्यवस्थेने शेती ते उत्पादनापासून बांधकाम, सेवा आणि ग्राहकपयोगी वस्तूंचा उपभोग अशा नानाविध क्षेत्रांमध्ये आपले पंख विस्तारलेले आहेत. या परिवर्तनाला चालना देत असलेले किवा ग्रामीण परिवर्तनाचा लाभ होत असलेले उद्योग क्षेत्र हुडकून काढण्यासाठी आम्ही वैविध्यपूर्ण आणि तळ ते शिखर अशा दृष्टिकोनाचा अवलंब करत आहोत. या ग्रामीण आर्थिक परिवर्तनात गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची संधी हा फंड अतिशय शिस्तबद्ध आणि सखोल संशोधनाच्या माध्यमातून प्रदान करत आहे.”
गुंतवणूकदारांसाठी हा फंड ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. एनएफओ कालावधी दरम्यान, गुंतवणूकदार किमान १,००० रुपये आणि त्यानंतर कितीही रक्कम गुंतवू शकणार आहे. एसआयपीसाठी गुंतवणूकदार ५०० रुपये आणि त्यानंतर कितीही रक्कम गुंतवू शकणार आहेत. कोटक रुरल अपॉर्च्युनिटीज फंडाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया www.kotakmf.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
गुंतवणूकदारांना ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही, याबद्दल काहीही शंका असल्यास त्यांनी त्यांच्या आर्थिक तज्ज्ञांचा आणि कर सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा. कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (KAMAMC) कोणत्याही परताव्याची हमी देत नाही किंवा भविष्यातील परताव्याचेही आश्वा
सन देत नाही.


