धार्मिक मिरवणूक काढत असताना पोलिसांची मदत घ्यावी लागते, तिथे या गावातील मिरवणुकीमध्ये विविध जातिधर्मांचे लोक, विद्यार्थी, युवक-युवती सर्वधर्मीयांची भजणे म्हणत आनंदात सहभागी होताहेत, हे नवलच म्हणावे लागेल. म्हणून रामेश्वर (रूई) केवळ मानवतातीर्थ नसून, त्याला विश्वधर्मी मानवतातीर्थ असेच म्हणावे लागेल.
दि. ०६ मे, २०२५ रोजी जागतिक किर्तीचे महान संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांनी रामेश्वर (रूई) या गावचे नामकरण विश्वधर्मी मानवता तिर्थ असे केले. विशेष म्हणजे रामेश्वर (रूई) या गावच्या सर्व नागरिकांनी, ग्रामसभेने व ग्रामपंचायतीने एकमुखाने तसा ठराव पारित केला होता. आज संत गोपाळबुवांच्या प्रांगणात २८८ फुट लांव आणि १२६ फुट रूंद असलेले विश्वधर्मी मानवता भवन उभे राहिले आहे. जगातील सर्व प्रसिध्द शास्त्रज्ञ व संत यांची ४४ भव्य तैलचित्रे येथे प्रत्येक खांबावर लावण्यात आली आहे. हे मानवता भवन म्हणजे बांधकामाचा वेगळाच आदर्श नमुना आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर या मानवता भवनाद्वारे सार्या जगाला महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडेगावाद्वारे विश्वशांतीचा, बंधुभावाचा आणि प्रेमाचा संदेश देत आहेत ते पाहून माझे तर हात जुळतात आणि तोंडातून शब्द फुटतात, धन्य ते विश्वधर्मी मानवता भवन रामेश्वर (रूई) गांव आणि धन्य ते प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यांना माझा साष्टांग नमस्कार, दंडवत.
मूळ लेखन : डॉ. एस. एन. पठाण
(माजी कुलगुरू
)


