: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सीनियर कॉलेज, मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यक्रम
पुणे : तरुणाई ही राष्ट्राच्या विकासाची खरी ताकद आहे. मात्र तणाव, नैराश्य आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. ‘नशा करून कोणतीही समस्या सुटत नाही, उलट ती अधिक जटिल होते आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळते. बलशाली भारत घडवायचा असेल तर देशाला सशक्त, जागरूक आणि निर्व्यसनी तरुणांची गरज आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सीनियर कॉलेज, मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान याविषयावर विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन कोथरूडमधील एमईएस सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कर्नल विपुल पाटील, महाराष्ट्र राज्य अँटी टेरर फोरमचे अध्यक्ष तुषार दामगुडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या पूनम रावत, बजरंग दल प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, विभाग मंत्री अतुल सराफ, विवेक गिरि, ओंकार बोत्रे , दत्ता तोंडे आदी उपस्थित होते. तरुणाईने यावेळी व्यसनमुक्तीची शपथ देखील घेतली.
प्रवीणकुमार पाटील म्हणाले, ‘तरुणांची ऊर्जा विधायक दिशेला वळवणे अत्यंत आवश्यक आहे. व्यसनाधीनतेमुळे केवळ त्या तरुणाचेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान होते. म्हणून प्रत्येक तरुणाने ‘नाही’ म्हणण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करावी.’
तुषार दामगुडे यांनी तरुणांना योग्य संगत ठेवण्याचे आवाहन करताना सांगितले,आपले मित्रपरिवारच आपले भविष्य घडवतो किंवा बिघडवतो. चांगल्या संगतीत राहिल्यास व्यसनापासून आपण दूर राहतो आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते.”
किशोर चव्हाण म्हणाले, भारताच्या ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. या तरुण शक्तीचा विधायक उपयोग झाला, तर देश जगात महाशक्ती बनेल. परंतु काही विघातक शक्ती तरुणांना व्यसनाच्या आहारी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हीही एक दहशतवादी मानसिकता आहे. या ‘व्यसनाधीनतेच्या दहशतवादाविरुद्ध’ तरुणांनी स्वतःहून लढा द्यावा.
सूत्रसंचालन श्रुती ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक गिरि यांनी केले.आशुतोष पांडे यांनी प्रास्ताविक केले.


