मधुमेहींसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांमुळे दैनंदिन आयुष्य अधिक सुकर
पुणे, 10 नोव्हेंबर 2025 : केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर,पुणेच्या डायबेटिस युनिटने सुरू केलेल्या विविध उपक्रमांमुळे मधुमेही आणि त्यांच्या कुटुंबियांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुकर झाले आहे. या विविध उपक्रमांमध्ये दैनंदिन व्यवस्थापनाबाबत सूचना व साधने,पालकांचे मार्गदर्शन यासह टाईप 1 मधुमेहाबाबत संपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ प्रदान केले जाते.याचा मूळ उद्देश्य मधुमेह व्यवस्थापनासह रूग्णालयात यायला लागण्याची वारंवारता कमी करणे,त्याचबरोबर एक सहाय्यक व परस्परसंवादी वातावरण निर्माण करणे हे आहे.
टाईप 2 मधुमेहासाठी एकाच छताखाली व्यापक सेवा
डायबेटीस मेलिटस, ज्याला सामान्यतः मधुमेह म्हणून ओळखले जाते, त्यात रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली असते. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर ते तयार करत असलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही तेव्हा ही स्थिती उद्भवते . मधुमेहाचे प्रमुख प्रकार आहेत: टाईप १, टाईप २ आणि गर्भावस्थेतील मधुमेह.
टाइप २ मधुमेह (T2D) हा प्रौढांमधील मधुमेहाचा सामान्य प्रकार आहे, जेव्हा शरीर तयार करत असलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही ( इन्सुलिन प्रतिरोध). लठ्ठपणा, निष्क्रियता, बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि कौटुंबिक इतिहास हे T2D साठी प्रमुख जोखीमकारक घटक आहेत. ‘लक्षणे नसणे’ हे T2D चे सर्वात सामान्य लक्षण आहे,कारण जास्त भूक, तहान आणि लघवी, वजन कमी होणे यासारखी लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. म्हणून रक्तातील साखरेच्या पातळीची नियमित तपासणी केल्यास लवकर निदान आणि वेळेवर उपचार करण्यास मदत होऊ शकते.
T2D व्यवस्थापनाचे ५ प्रमुख महत्वाच्या बाबींमध्ये – आहार, व्यायाम, नियमित देखरेख, औषधे आणि योग्य महिती यांचा समावेश आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू, नसा आणि पाय यासारख्या महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते.
टाईप 2 मधुमेहाच्या बाबतीत केईएम हॉस्पिटल,पुणे येथे एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध आहेत.त्यामध्ये डायबेटिस रिनल ओपीडी,फिजिओथेरपी क्लिनिक,फूट क्लिनिक,जीडीएम क्लिनिक (गर्भावस्थेत होणारे मधुमेह) व न्युट्रिशन क्लिनिकचा समावेश आहे.याला तज्ञ डॉक्टर्स,प्रमाणित आहार तज्ञ,लॅब तंत्रज्ञ यांचे भक्कम पाठबळ आहे.आजवर 10,000 हून अधिक रूग्ण नोंदणीकृत असून या विभागामध्ये वैयक्तिक गरजांनुसार सेवा प्रदान केल्या जातात तसेच, जागरूकता उपक्रम राबविले जातात.
टाईप १ मधुमेहींसाठी विविध उपक्रम
केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे 2018 मध्ये क्लबवन केईएम हा उपक्रम सुरू करण्यात आला.यामध्ये व्हॉटसॲप ग्रुप,56 शैक्षणिक व्हिडिओज असलेला युट्युब चॅनल,फेसबुक पेज यांचा समावेश आहे. यामध्ये 800 सदस्य जोडले गेले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे तज्ञांद्वारे मार्गदर्शन,एकमेकांचे अनुभव सांगणे आणि माहितीपर उपक्रम सुरू आहे.
याशिवाय टाईप 1 मधुमेही आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांसाठी मधुरक्षा मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले. हे मोफत ॲप्लिकेशन अँड्रॉईड व आयओएसवर उपलब्ध आहे. यामध्ये देखील 800 सक्रीय वापरकर्ते असून 2000 लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. यामध्ये इन्शुलिन देण्याबाबत मार्गदर्शन,ग्लुकोज मॉनिटरिंग,कर्बोदकांची मोजणी,प्रवासावेळी घ्यावयाची काळजी,सामान्य प्रश्नावलींची उत्तरे अशी सर्व माहिती मराठी,हिंदी व इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे. एखाद्या रेडीरेकनर प्रमाणेच या ॲपमध्ये पॉकेट डायबडी यामुळे रूग्ण आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य माहिती उपलब्ध होते.
टाईप 1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी रोज इन्शुलिन इंजेक्शन्स आणि नियमित रक्तातील साखरेचे निरीक्षण उपचाराचा एक भाग असतो.लहान मुले बहुतांश वेळेत शाळेत असतात.त्यात एक किंवा दोन उपहार हे शाळेत असतात आणि त्यामुळे साखरेचे प्रमाण तपासणे आणि इन्शुलिन घेणे गरजेचे असते.हे बघता एनसीपीसीआर (राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग) ने शाळेच्या वेळेत तसेच परीक्षेदरम्यान साखरेच्या पातळीची तपासणी आणि इन्शुलिन इंजेक्शन देण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे शाळेमध्ये इन्शुलिन आणि संबंधित साहित्य नेणे गरजेचे आहे.मात्र इन्शुलिनच्या साठवणासाठी व इष्टतम परिणाम मिळण्यासाठी 4 ते 8 डिग्री तापमान आवश्यक असते.ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळावे यासाठी केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरने डायबॅग ही एक विशेष बॅग तयार केली आहे.यामध्ये इन्शुलिनसाठी कोल्ड कंपार्टमेंट,ग्लुकोमीटर,इतर साहित्य व तातडीच्या परिस्थितीत संपर्क क्रमांक यांचा समावेश आहे.या डायबॅगचा उपयोग लहान मुले घरापासून दूर असताना प्रभावीपणे होत असून हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी होणे) सारख्या आपात्कालीन परिस्थितीत वेळेवर मदत मिळू शकते.
क्लबवन केईएम रुग्णांच्या सहभाग आणि सक्षमीकरणासाठी अनेक कार्यशाळा, स्पर्धा आणि बाह्य शिबिरे देखील आयोजित केली जातात .
या उपक्रमांचे फलित म्हणजे स्व व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण झाले आहे आणि यामुळे मधुमेह व्यवस्थापनाबाबत वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एकंदर टाईप 1 मधुमेहींच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे.एवढ्या मोठ्या समुदायाशी जोडले गेल्याने एक सहयोगात्मक व संवादात्मक वातावरण निर्माण झाले असून मानसिक पाठबळ मिळाले आहे.
टाईप 1 डायबेटिस (टीआयडी) या स्थितीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडामधील इन्शुलिन उत्पादक बीटा पेशींवर हल्ला करतात.त्यामुळे शरीरात इन्शुलिनची कमतरता निर्माण होते किंवा इन्शुलिन तयार होत नाही.टाईप 1 मधुमेह हा बहुतांश वेळेस लहान मुले किंवा किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो. ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी दररोज इन्शुलिन इंजेक्शनची आवश्यकता असते.योग्य इन्शुलिन प्रमाण,रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण आणि निरोगी आहार व जीवनशैली राखल्याने टाईप 1 मधुमेहींना चांगले जीवनमान मिळू शकते व मधुमेही संबंधी गुंतागुंत टळू शकते.मात्र इन्शुलिनची मर्यादित उपलब्धता व योग्य आरोग्यसेवेची उपलब्धता नसल्यास गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.याव्यतिरिक्त टाईप 1 मधुमेहाच्याबाबतीत उपचारांचा खर्च हा विशेष करून गरीब कुटुंबियांसाठी हा एक प्रमुख समस्या आहे.
आयडीएफ ॲटलस प्रमाणे नवीन निदान होणाऱ्या टाईप 1 मधुमेहींच्या बाबतीत (15 वर्षाखालील मुले) भारताचा क्रमांक हा दुसरा आहे. या आकडेवरीप्रमाणे दरवर्षी 11,300 मुलांना टाईप 1 डायबेटिसचे निदान होते. टाईप 2 डायबेटिसच्या बाबतीत अनेक प्रकारची संशोधने व सार्वजनिक आरोग्य उपक्रमात मात्र टाईप 1 च्या बाबतीत पुरेसे उपक्रम अजून उपलब्ध नाहीत.
या सर्व गोष्टींचा विचार करून केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे विविध उपक्रम सुरू करण्यात आले.उपचारांसांठी साहाय्य आणि यामध्ये अधिक संशोधन व्हावे या दृष्टीने हिंदुजा फाऊंडेशनचे डायबेटिस युनिटला पाठबळ मिळाले आहे. याशिवाय गरजू रूग्णांच्या उपचाराच्या साहाय्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशन व नित्याशा फाऊंडेशन सारख्या स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक दाते हे केईएम हॉस्पिटलशी जोडले गेले आहेत.


