पुणे, दिनांक, १६ डिसेंबर, २०२५ : पुणे सराफ असोसिएशनच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने येत्या शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सारसबाग येथे सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० या वेळेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी कळविली आहे. सदर स्पर्धा ही जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात आली आहे हे विशेष.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पुणे सराफ असोसिएशनच्या शताब्दी वर्षानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले आहे. पुणे शहरातील जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यानिमित्ताने असोसिएशन करत आहे.
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास चित्रकला पेपर, प्रशस्तीपत्रक, खाऊ इ. संयोजकांच्या वतीने देण्यात येईल. स्पर्धेत कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून स्पर्धा विनामूल्य आहे.
सदर स्पर्धा (गट अ १ ली व २ री साठी), (गट ब ३ री व ४ थी साठी), (गट क ५ वी ते ७ वी साठी), (गट ड ८ वी ते १० वी साठी) आणि (खुला गट, वय वर्षे १८ पुढील) अशा एकूण ५ गटात होईल. यामधील पहिल्या व दुसरा गटासाठी स्पर्धेचे स्वरूप हे रंग भरण स्पर्धा असे असेल. तर उर्वरित ३ गटासाठी चित्राचे विषय हे स्पर्धेच्या वेळी देण्यात येतील.
तरी पुणे शहरातील जास्तीत जास्त शाळेतील विदयार्थ्यांनी या भव्य चित्रकला स्पर्धेत सहभाग घ्यावा. प्रत्येक गटामध्ये एकूण ७ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी मुलांना जादुचे प्रयोग दाखविले जाणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने कळविण्यात
आले आहे.


