पुणे, दि. ११:
‘वंदे मातरम’, भारत माताकी जय’, ‘आणीबाणी रद्द करा’ अशा घोषणा देत सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील 16 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 11 डिसेंबर 1975 रोजी महाविद्यालयाच्या आवारात आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला. आणीबाणीच्या कालखंडात शहरातील विद्यार्थी वर्गात झालेला हा पहिला सत्याग्रह असून त्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यातील 16 जणांपैकी नऊ जण महाविद्यालयाच्या आवारात एकत्र येऊन तेव्हा केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. आणीबाणीच्या आठवणी जागवण्यासाठी आलेल्या या साऱ्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट यांनी केले.
श्रीधर मधूकर उर्फ राजा दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली तेव्हा स. प. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसह बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनीही त्यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये अरविंद वसंत शिराळकर, चंद्रशेखर प्रभू हिरेमठ, विवेक कृष्णराव सबनीस, मोरेश्वर कृष्णाजी मांडके, श्रीकांत भास्कर केळकर, अनिल अवधूत पेंडसे, आनंद गजानन केळकर, विश्वास हरी जोशी, प्रदीप केशव भट, मिलींद माधव कसबेकर आणि मुकेश माधव कसबेकर यांच्यासह भारती कुलकर्णी-ठुसे आणि सुनिता पुराणिक-गोडबोले या विद्यार्थिनींचाही सक्रिय सहभाग होता.
देशात पुकारलेल्या आणीबाणीचा निषेध करत या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घोषणा दिल्या तर राजा दीक्षित यांनी आणीबाणी कशी चुकीची आहे हे सांगणारे भाषणही तेव्हा केले होते. तेव्हाच्या विश्रामबाग ठाण्याच्या पोलिसांनी कॉलेजच्या आवारात येऊन या साऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि घोषणा देत हे सारे विद्यार्थी पोलिस व्हॅनमध्ये बसले. त्यांना आधी विश्रामबाग ठाण्यात नेऊन तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी उशीरा साऱ्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात दीड महिन्यांच्या कारावासाठी झाली.
लोकशाहीतील काळा दिवस समजल्या जाणाऱ्या 25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली होती. त्याचा निषेध म्हणून राजकीय नेत्यांबरोबरच विद्यार्थी वर्गही ‘सत्याग्रह’च्या अहिंसक मार्गाने आणीबाणीचा निषेध करून तुरुंगात गेला होता. पुण्यातील विविध महाविद्यालयांमधील लोकशाहीची बूज राखणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन तुरुंगवासही पत्करला होता.
स. प. महाविद्यालयाच्या आवारात राजा दीक्षित उर्फ इतिहासाचे गाढे आभ्यासक व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित तेव्हा इतिहास या विषयात पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होते. ते म्हणाले की, पाच दशकांपूर्वीचा आणीबाणीविरोधातला आमचा विरोध हा मनापासून केलेला होता. पक्षीय विचारसरणी विसरून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि हा लढा आमच्या पातळीवर यशस्वी केला. तेव्हा विद्यार्थी वर्गातही आणीबाणीविरोधातले वातावरण होते. तो एक मंतरलेला काळ होता. आज त्याची रोमहर्षक आठवणही मनाला उभारी देते.
या नऊ आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी माधव कापरे, विजय गोवंडे आणि मैत्रेयी कसबेकर यावेळी उपस्थित होते.
आंदोलक विद्यार्थ्यांपैकी आनंद केळकर म्हणाले की तत्कालीन प्राचार्य के. पं. मंगळवेढेकर यांनीही आमच्या या आंदोलनास अप्रत्यक्षरित्या सहानुभूती दर्शवली.
विवेक सबनीस म्हणाले की, तुरुंगवासाच्या कालखंडात महाविद्यालयातील वर्गात आवश्यक असणारी हजेरी लावता आली नाही. तरी प्रा. कविता नरवणे यांच्यासारख्या प्राध्यापकानी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे माझे शैक्षणिक वर्ष
वाया गेले नाही.


