Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभू -आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील आर्थिक...

भू -आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील आर्थिक समन्वय महत्त्वाचा – तज्ञ * आठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉगचे पुण्यात उदघाटन

पुणे, २९ फेब्रुवारी २०२४ : भू -आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील आर्थिक समन्वय महत्त्वाचा असल्याचे मत तज्ञांनी आज येथे व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे आठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉगचे उदघाटन आज रोजी करण्यात आले. ‘वाढत्या प्रवाहाच्या युगात भौगोलिक व आर्थिक आव्हाने’ या संकल्पनेवर केंद्रित एईडी 2024 मध्ये ११ देशांतील ४६ वक्ते तीन दिवसांच्या १२ सत्रांमध्ये सहभागी झाले आहेत. ही आंतरराष्ट्रीय परिषद आशिया आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या आर्थिक बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा करत आहेत. उद्घाटन सत्रात प्रख्यात शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘दक्षिण आशियातील आर्थिक एकात्मतेला चालना देणे’ या विषयावरील उद्घाटन सत्रात परिसंवादाचे संयोजक व अध्यक्ष राजदूत गौतम बंबावाले यांच्यासह भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा; सेवा लमसाल, परराष्ट्र सचिव, नेपाळ; आणि राजदूत मसूद बिन मोमेन, परराष्ट्र सचिव, बांगलादेश सहभागी झाले होते.

दृकश्राव्य माध्यमातून बोलताना भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले की,आशियाई इकोनॉमिक डायलॉगची भू-आर्थिक आव्हानांवर केंद्रित संकल्पना ही आजच्या काळासाठी सुयोग्य आहे. ही आव्हाने तीन प्रकारात मोडतात.त्यामध्ये पुरवठा साखळी संबंधित आव्हाने,तंत्रज्ञान संबंधित आव्हाने आणि जागतिकीकरणाच्या काळात एकाच ठिकाणी सगळी साधने एकवटणे यांचा समावेश आहे. एक सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण जागतिक वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहे.

भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, जगभरात सुरू असलेले युध्द आणि त्यामुळे होणार्‍या परिणामांना तोंंड देण्यासाठी प्रत्येक देशाकडून मजबूत उपाय गरजेचे ठरतात. मात्र,भू-आर्थिक स्थिती अनेक प्रकारे विशेष करून भारतासारख्या देशांना काही संधी निर्माण करतात. जगभरात विविध देश पुरवठा साखळी,बाजारपेठ आणि गुंतवणूकीवर परतावा देणारी विश्‍वासार्ह ठिकाणे शोधत असताना भारताला त्याचा फायदा झाला आहे. हे कोविड पश्‍चात झालेल्या विकासामध्ये दिसून येते. आर्थिक विकासाबाबत विविध उदाहरणे देत ते म्हणाले की,यामुळे फक्त भारतालाच नाही तर जगभरातील उद्योग जगताला आशा निर्माण झाली आहे.

नेपाळच्या परराष्ट्र सचिव सेवा लमसाल म्हणाल्या की, कोविड आणि जगातील युध्दांमुळे नेपाळसारख्या भू बंदिस्त देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र आता धोरणात्मक सुधारणा आणि कठोर वित्तीय नियमांमुळे विकासाला गती मिळाली आहे.

बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन म्हणाले की, दक्षिण आशियाई देशांमधील परस्पर व्यापार हा जगामध्ये सर्वात कमी आहे. संपर्क सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असून यामध्ये फक्त वास्तविक पायाभूत संपर्क सुविधाच नव्हे तर कस्टम्स सारख्या संपर्क सुविधांमध्ये देखील सुधारणा होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments