महाराष्ट्रातील ग्रामीण व निमशहरी भागात हिवाळा सुरू होत असताना, मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी विशेषतः पहाटेच्या वेळेत उद्भवणाऱ्या शांत पण गंभीर आरोग्य आपत्कालीन परिस्थितींबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हृदयतज्ज्ञ डॉ. सूरज पाटील यांनी सांगितले की, थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाबात अचानक वाढ होण्याचा धोका निर्माण होतो. क्लिनिकल निरीक्षणानुसार, हिवाळ्यात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निमशहरी भागात हृदयविकार व मेंदूविकार (स्ट्रोक) रुग्णसंख्येत सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी वाढ दिसून येते.
सामान्य वैद्यांच्या मते, ग्रामीण भागातील सुमारे 60 टक्के हृदयविकाराच्या रुग्णांकडून सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केली जातात. ही लक्षणे थंडीमुळे आलेली थकवा किंवा पोटाच्या (गॅस्ट्रिक) त्रासाशी जोडली जात असल्याचे आढळते.
न्यूरोसर्जन डॉ. निनाद पाटील यांनी स्पष्ट केले की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे हिवाळ्यातील सुमारे 65 टक्क्यांहून अधिक स्ट्रोक प्रकरणांचे प्रमुख कारण ठरतात. वेळेत उपचार न मिळाल्यास मेंदूविकारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका वाढतो, असेही त्यांनी नमूद केले.
डॉक्टरांनी या बाबीबद्दलही चिंता व्यक्त केली की अनेक जण पहाटेच दैनंदिन कामे सुरू करतात.
“सूर्योदयापूर्वी थंड हवामानाचा थेट संपर्क हा हृदय व मेंदूविकाराच्या घटनांना कारणीभूत ठरू शकतो,” असा इशारा तज्ज्ञांनी दिला.
आणखी एक गंभीर अडचण म्हणजे उपचारांसाठी होणारा विलंब. अंदाजानुसार, ग्रामीण भागातील 35 टक्क्यांहून अधिक रुग्ण ‘गोल्डन अवर’नंतर रुग्णालयात पोहोचतात, ज्यामुळे पूर्ण बरे होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी नागरिकांना सूर्योदयानंतरच बाहेरची कामे सुरू करण्याचा, नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचा आणि छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, अचानक अशक्तपणा, बोलण्यात अडचण किंवा चक्कर येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला.
“हिवाळ्यात लक्षणांची लवकर ओळख आणि वेळीच उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,” असे दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.


