Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदी कला सत्र’ महोत्सवात भारतीय शास्त्रीय नृत्यांचा अद्भुत संगम आदी स्कूल ऑफ...

आदी कला सत्र’ महोत्सवात भारतीय शास्त्रीय नृत्यांचा अद्भुत संगम आदी स्कूल ऑफ डान्स’च्या वतीने आयोजन

पुणे : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणाऱ्या सत्रिय, छाऊ, कथकली आणि कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारांचा मनोहारी संगम पुणेकरांना अनुभवता आला. विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांना कथाकथनाच्या माध्यमातून एकत्र विणत भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे व्यापक दर्शन प्रेक्षकांना घडवण्यात आले.

 

‘आदी स्कूल ऑफ डान्स’च्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित ‘आदी कला सत्र’ महोत्सवात लय, भाव, अभिनय आणि संगीत यांचा सुरेख मेळ घालत सादरीकरण करण्यात आले. या महोत्सवाचे दिग्दर्शन सत्रिया नृत्यप्रकारातील प्रख्यात नृत्यांगना आणि ‘आदी स्कूल ऑफ डान्स’च्या संस्थापिका डॉ. देविका बोरठाकूर यांनी केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरु सुचेता भिडे चापेकर, आणि भारती विद्यापीठ परफार्मिंग आर्ट्स चे संचालक शारंगधर साठे उपस्थित होते.

 

महोत्सवाच्या केंद्रस्थानी आसाममधील सत्रिय हा शास्त्रीय नृत्यप्रकार होता. संत-सुधारक श्रीमंत शंकरदेव यांनी स्थापन केलेल्या वैष्णव सत्रांमधून उदयास आलेल्या सत्रिय नृत्याची ओळख त्याच्या कोमल लयकारी, भावपूर्ण अभिनय आणि आध्यात्मिक आशयामुळे आहे. यासोबतच छाऊ, कथकली आणि कथक या नृत्यप्रकारांमधून उषा-अनिरुद्ध, भक्त प्रल्हाद आणि अंध मुनी यांसारख्या पौराणिक कथांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सत्रिय नृत्यप्रकाराचे सादरीकरण डॉ. देविका बोरठाकूर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले. कथकलीचे सादरीकरण प्रख्यात कलाकार रेंजिश नायर यांनी, कथकचे सादरीकरण रूपा राणी दास-बोरा यांनी, तर छाऊ नृत्यप्रकाराचे सादरीकरण अक्रम शेख, सम्हिता चौधरी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी साकारले.

 

सुचेता भिडे चापेकर म्हणाल्या, भारतीय शास्त्रीय नृत्यांबद्दल रसिकांची आवड हळूहळू वाढत असून प्रेक्षकसंख्येतही वाढ होत आहे. ही बाब पारंपरिक कलांच्या भविष्यासाठी सकारात्मक आहे.

 

नवल किशोर राम म्हणाले, नृत्य भारतीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. नृत्य ही केवळ कला नसून ती भावना, कथा आणि मूल्ये व्यक्त करणारी सशक्त भाषा आहे. ती समाजाला एकत्र बांधते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. पुण्यासारख्या ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात नृत्य शिक्षणासाठी स्वतंत्र संस्थांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आसाममधील माजुली येथील उत्तर कमलबारी सत्रातील सत्रिया नृत्यप्रकाराचे अभ्यासक कृष्णा जडुमणी यांनी डॉ. बोरठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. पुण्यात सत्रिया नृत्यप्रकाराला भरतनाट्यम आणि कथकच्या बरोबरीने ओळख मिळवून देण्यात डॉ. बोरठाकूर यांचा मोठा वाटा आहे. ‘भक्त प्रल्हाद’ सादरीकरणातील सत्रिया, कथकली आणि छाऊ यांचा संगम विशेष भावला, असे त्यांनी सांगितले.

 

डॉ. देविका बोरठाकूर म्हणाल्या, मागील दहा वर्षांपासून पुण्यात सत्रिय नृत्यप्रकाराचा सातत्याने प्रसार करत आहे. भारताच्या विविध नृत्यपरंपरा एकत्र आणून, कथाकथनाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हा या महोत्सवाचा मुख्य

उद्देश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments