पुणे : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार व लोकनेते तसेच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना शहरातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. मान्यवरांनी गप्पांमधून या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, क्रीडा, कला, चित्रपट, उद्योग अशा विविध क्षेत्रात शहराला उंचीवर नेणारे सुरेश कलमाडी (वय८१) यांचे मंगळवारी निधन झाले. कलमाडी कुटुंबीयांच्या वतीने बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथे शुक्रवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कलमाडी यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली. सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी , चिरंजीव सुमीर, सून नंदिता, विवाहित कन्या सोनाली व पायल यांचे मान्यवरांनी सांत्वन केले.
पूना क्लबमधील हिरवळीवरील मांडवामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुरेश कलमाडी यांची तसबीर ठेवण्यात आली होती. मान्यवरांनी तसबिरीला फुले वाहून आणि
दर्शन घेऊन सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण मांडवात उदबत्तीचा सुवास दरवळत होता. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सुरेश कलमाडी यांची विविध छायाचित्रे झळकत होती. बालपणातील, तरुणपणातील , राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए), हवाई दलातील, राजकारणातील, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, क्रीडा स्पर्धा यातील छायाचित्रांनी सुरेश कलमाडी यांच्या जीवनाचा पट यावेळी उपस्थितांसमोर मांडला.
सुरेश कलमाडी यांच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्यामुळे राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, क्रीडा , शिक्षण, आर्थिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील नामवंतांची मांदियाळी येथे जमली होती. सुरेश कलमाडी यांनी नावीन्याचा ध्यास घेऊन शहराचा केलेला कायापालट, शहरात राबवलेल्या विविध योजना, गणेशोत्सवातील पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव , पुणे व्यासपीठ अशा कलमाडी यांच्या कल्पकवृत्तीला पुणेकरांनी नमन केले.
सुरेश कलमाडी हे उत्तम क्रीडा संघटक होते. पुणे शहरात सुरू केलेली मॅरेथॉन त्यांनी जागतिक पातळीवर नेली. पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे तसेच दिल्लीतील राष्ट्रकुल
क्रीडा स्पर्धेचे त्यांनी केलेले दिमाखदार आयोजन या आठवणींना क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला.
रघुपती राघव राजाराम, सूर निरागस हो ,
शिवनंदना हे शुभनायका, जय गुरू ओमकारा,
जय जयदुर्गे माँ, नारायण नारायण जय गोपाल हरे, हरे रामा हरे कृष्णा , सुंदर ते ध्यान, मोगरा फुलला अशा भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सरिता कुमठेकर ( गायन) , सायली चितोडकर ( गायन) , श्लोक मोकलकर ( गिटार) , शिवानंद वैरागकर ( तबला), ओंकार डांगमाळी( किबोर्ड) , अभय ओक ( बासरी)
विवेक भागवत ( संयोजक) यांचा सहभाग होता.
‘माझे वडील आज आपल्यात उपस्थित नाहीत. या सभेला बाबांचे अनेक मित्र, सहकारी आले. गेले काही दिवसांपासून कलमाडी हाउस येथे बाबांचे अनेक मित्र, प्रियजन येत आहेत. कलमाडी हाउस लोकांनी गजबजून गेले आहे.
निवडणूक, क्रीडा महोत्सवाची तयारी हे पूर्वीचे दिवस आम्हाला आठवले. सुरेशभाईंच्या निधनाने युग संपले अशी भावना व्यक्त होत आहे. कठीण काळात लोकांनी आम्हाला साथ दिली. आम्ही त्यांचे आभारी आहोत,’ अशी भावना सुमीर कलमाडी यांनी व्यक्त केली.
—————
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,
खासदार रजनी पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, बाबा कल्याणी, माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अॅड. अभय छाजेड, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई ज्येष्ठ विधिज्ञ अॅड . एस के जैन,
अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे
माजी सचिव ललित भानोत, अशोक सहोटा, कुशल हेगडे, नरेंद्र बात्रा, संजीव मेहता, मिशेल पूनावाला, ललित मोहन, सुभाष सणस, प्रशांत फिरोदिया, विठ्ठलशेठ मणियार, अजय शिर्के, कुमार आणि नलिनी गेरा, प्रकाश म्हस्के, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, संगीता तिवारी, सदानंद शेट्टी, सुरेश पिंगळे, गोविंदराव कुलकर्णी , राजीव साठे, बाळासाहेब अमराळे , सौरभ अमराळे
यांची प्रमुख उपस्थिती होती.


