अष्टपैलू सौ मेघना साने यांच्या
” तिला काय हवय” या कथा संग्रहाचे,त्यांच्या कन्या, समुपदेशक सायली केळकर यांच्या “The Echos of Awakening ” या इंग्रजी कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाण्यात एका शानदार कार्यक्रमात झाले. यावेळी
श्री हेमंत साने यांनी त्यांच्या “मुल द्रव्यांच्या जादुई दुनिया” या आगामी पुस्तकाची आकर्षक व्हिडिओच्या सहाय्याने माहिती दिली. पुस्तकांचे प्रकाशन, कवितांचे सादरीकरण,रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि त्यांची मिळणारी दाद यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कवयित्री सायली केळकर
यांनी त्यांच्या कविता संग्रहाची निर्मिती कशी झाली, हे सांगताना इंग्लंड मधील वास्तव्यात त्यांना आलेले अनुभव छान उलगडून सांगितले. तसेच या कविता संग्रहातील एक कविता प्रभावीपणे सादर केली.
मेघना साने यांनी त्यांच्या पुस्तकाविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, प्रमुख पाहुण्या अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, लेखिका प्रतिभा सराफ यांनी
” तिला काय हवय” या पुस्तका चे रसग्रहण सादर केले.
यावेळी बोलताना निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी कोरोना काळात
साने दाम्पत्याने निस्वार्थपणे
लोकांचे मनोरंजन करून सामाजिक बांधिलकी जपली, असे गौरवोद्गार काढले. यावेळी देवेंद्र भुजबळ यांनी, कवी कुसुमाग्रज यांच्या, एका तुफानाला कुणी घर देता का घर…या काव्याचे;
“कुणी तिकीट देता का तिकीट ” हे आजच्या राजकारणाचे विदारक वास्तव मांडणारे विडंबन सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
“गप्पागोष्टी” फेम जयंत ओक यांनी यावेळी काही गमतीशीर अनुभव सांगून उपस्थितांना चांगलेच हसवले .
प्रारंभी कलाकारांनी सुरेल आवाजात ओव्या सादर करून
चांगली वातावरण निर्मिती केली.
तपस्या नेवे यांनी सर्व कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन केले.प्रकाशक अशोक मुळे यांनी प्रास्ताविक केले. तर श्री हेमंत साने यांनी आभार मानले.
लेखन:जगन्नाथ पाटील.
+91 9869484800


