विकसित भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासात आजची पिढी महत्त्वाची भूमिका बजावेल : राज्यपाल रमेश बैस पीआयबीएमचा १४ वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

तारां कित Avatar

पुणे दि. ४ : “आजच्या पिढीला २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. आजच्या तरुण पिढीने कल्पक बनले पाहिजे, जोखीम पत्करली पाहिजे आणि स्वतःचे उद्योग आणि स्टार्टअप सुरु केले पाहिजेत. तसेच देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे,” असे मत राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी व्यक्त केले.

पिरंगुट येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या (पीआयबीएम) १४ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बैस बोलत होते. नागपूर आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉ. भारतभूषण सिंग, वेकफिल्ड फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस सचदेवा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी पदके देण्यात आली.

श्री. बैस म्हणाले, वर्ष २०४७ पर्यंत भारताला एक विकसित देश म्हणून पाहण्याची आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची संधी तरुण पिढीला मिळेल.पूर्वीचे विद्यार्थी चांगले पॅकेज घेऊन परदेशात जात असत. मात्र आता परिस्थिती बदलत असून प्रत्यक्षात विदेशातून देशात उलटे स्थलांतर सुरू झाले आहे. चांद्रयान, जी २०, आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाने आपल्या देशाला आत्मविश्वास दिला आहे. जी २० च्या यशामुळे जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होईल.आपण आपल्या लोकांसाठीकिती संधी निर्माण करू शकतो यावर यातून किती फायदा होईल हे अवलंबून आहे.

विद्यार्थ्यांनी जोखीम पत्करणारे आणि नवोन्मेषक बनण्याचे मी आवाहन करतो. स्वतःचे उद्योग आणि स्टार्टअप तयार करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना भरपूर क्षमता विकसित करण्यासाठी मदत करेल.तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल,” असेही श्री. बैस म्हणाले.

पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत म्हणाले, “आपले राज्य संपूर्णरित्या कुशल बनवण्यासाठी योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली पाहिजे. ध्येय आणि यश मिळवण्यात प्रतिभा आणि कौशल्याव्यतिरिक्त सकारात्मक दृष्टिकोनाचा मोठा वाटा असतो.”

डॉ. मेत्री म्हणाले, “कॉर्पोरेट जगताचा विचार केला तर प्रवास आणि सीमा वेगळ्या असतात. भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना हा दीक्षांत समारंभ एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी आता गतिमान, स्पर्धात्मक जगात प्रवेश करतील. पण प्रत्येक अडथळा, संकट अनेक संधी घेऊन येते.”

यशाची पंचसूत्री सांगताना डॉ. मेत्री म्हणाले, ” अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रथम नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. मोठी स्वप्ने पाहावीत. भारतीय नीतिमत्ता, मूल्ये सोबत ठेवून जगावे. तंत्रज्ञानाचा वापरकर्ता बनण्याऐवजी विकसक व्हावे.आव्हानात्मक वातावरणात काम करून सर्वोत्कृष्ट परिणाम देण्यासाठी सक्षम बनावे. सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी कंफर्ट झोन सोडून काम करावे.”

दीक्षांत समारंभाच्या उत्तरार्धात भारताचे शिक्षण राज्यमंत्री श्री. सुभाष सरकार (दृक्श्राव्य माध्यमातून), बिस्लेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँजेलो जॉर्ज आणि जाफा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

परीक्षा नियंत्रक हर्षदा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रतिज्ञा दिली.

या पदवीदान समारंभात एमबीएच्या 323 (फायनान्स – 96,मार्केटिंग – 117, फिनटेक – 31, प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट – 36, एच आर- 43) तर पीजीडीएमचे 359 (फायनान्स – 117, मार्केटिंग – 155 , ॲनालिटीक्स-38, एच आर- 49) विद्यार्थ्यांसह एकूण 682 पदवी प्रदान करण्यात आली.

या पदवीदान समारंभात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध अभ्यासक्रमातील 16 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तसेच 49 विद्यार्थ्यांना इतर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Tagged in :

तारां कित Avatar