पुणे, 27 जानेवारी 2026:रूबी हॉल क्लिनिकने प्रादेशिक कर्करोग उपचार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत भारतीय उपखंडातील पहिली रोबोटिक हाय-इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड (HIFU) थेरपी सुरू केली आहे. प्रोस्टेट कॅन्सरसाठीची ही अत्याधुनिक, नॉन-इनवेसिव्ह उपचार पद्धत रूबी हॉल क्लिनिक येथे नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या कल्याणी इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक HIFU थेरपीयेथे उपलब्ध असेल.
या सुविधेचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे नेतृत्व डॉ. पी. के. ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट आणि डॉ. हिमेश गांधी तसेच कल्याणी कुटुंबाचे प्रतिनिधी डॉ. बाबा कल्याणी, सौ. सुनीता कल्याणी आणि भारत फोर्जचे श्री. अमित कल्याणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी Focal One संस्थेचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रो. पास्कल (युनिव्हर्सिटी ऑफ टुलूज), डॉ. डॅमियन, उपाध्यक्ष आणि सीईओ श्री. रायन यांचा समावेश होता, ते देखील याप्रसंगी उपस्थित होते.
भारतामध्ये अत्याधुनिक कॅन्सर उपचारांची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने कल्याणी कुटुंबाच्या सहकार्यामुळे रूबी हॉल क्लिनिकमध्ये या संस्थेची स्थापना शक्य झाली आहे.
भारतामध्ये दरवर्षी 40,000 हून अधिक नवीन प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणे निदानास येतात. मात्र, शस्त्रक्रिया किंवा किरणोपचारांशी संबंधित जोखमींमुळे विशेषतः पुनर्प्राप्ती कालावधी आणि दीर्घकालीन शारीरिक कार्यक्षमतेबाबतच्या भीतीमुळे अनेक रुग्ण उपचार पुढे ढकलतात.
रोबोटिक HIFU थेरपी या भीती दूर करते कारण ती पुढील फायदे देते:
• अचूक लक्ष्यीकरण: आजारी ऊती नष्ट करताना आजूबाजूच्या निरोगी ऊती सुरक्षित ठेवते
• नॉन-इनवेसिव्ह प्रक्रिया: कोणतीही चिरफाड किंवा किरणोत्सर्ग नाही
• जलद पुनर्प्राप्ती: बहुतांश वेळा डे-केअर पद्धतीने उपचार, रुग्ण लवकर दैनंदिन आयुष्यात परतू शकतो
• जीवनमानाचे जतन: पारंपरिक उपचारांच्या तुलनेत मूत्र व लैंगिक कार्यावर होणारा दुष्परिणाम लक्षणीयरीत्या कमी
यावेळी बोलताना डॉ. पी. के. ग्रँट, अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त, रूबी हॉल क्लिनिक म्हणाले,
“रूबी हॉल क्लिनिकमध्ये भारतीय उपखंडातील पहिली रोबोटिक HIFU थेरपी सुरू होणे हे आमच्या प्रदेशातील कॅन्सर उपचारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक वर्षे वाट पाहण्याऐवजी रुग्णांपर्यंत प्रगत आणि अर्थपूर्ण वैद्यकीय तंत्रज्ञान लवकर पोहोचवणे ही आमची कायमची बांधिलकी आहे. हा उपक्रम त्याच दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असून रुग्णांचे परिणाम आणि जीवनमान दोन्ही जपणारे उपचार पर्याय उपलब्ध करून देतो.”
क्लिनिकल दृष्टिकोनातून डॉ. हिमेश गांधी, सल्लागार यूरो-ऑन्कोलॉजिस्ट व संचालक, रोबोटिक सर्जरी, रूबी हॉल क्लिनिक म्हणाले,“अनेक पुरुषांसाठी कॅन्सरइतकीच उपचारांची भीती मोठी असते. रोबोटिक HIFU ही भीती दूर करते, कारण ही उपचारपद्धत नॉन-इनवेसिव्ह असून रुग्णांच्या स्वावलंबनाला आणि लवकर दैनंदिन आयुष्यात परतण्याला प्राधान्य देते.”
कल्याणी इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक HIFU थेरपीच्या स्थापनेमुळे, रूबी हॉल क्लिनिक प्रगत कॅन्सर उपचार क्षेत्रात आपले नेतृत्व अधिक भक्कम करत असून, सुलभता, क्लिनिकल उत्कृष्टता आणि रुग्णांच्या अनुभवात सुधारणा यावर विशेष भर देत आहे.


